छत्रपती संभाजीनगर, दि.१२ (जिमाका) – शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला.
जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस राज्याचे इमाव कल्याण, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, प्रदीप जयस्वाल, अनुराधा चव्हाण तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, रस्त्याचे मोजमाप बरोबर होण्यासाठी रस्त्याचे मध्यबिंदू नकाशानुसार घ्या. त्यासाठी नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागाने संयुक्त मोजणी करावी. परवानगी असलेली बांधकामे जर रस्त्याच्या हद्दीत येत असतील तर संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्या. जेथे आवश्यक आहे तेथे गुंठेवारी करुन बांधकामे नियमानुकूल करा. मोहिमेत जे लोक बाधीत होत आहेत त्यांना म्हाडामार्फत घरे देण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. याशिवाय अन्यत्रही वसाहती म्हाडामार्फत उभारुन घरे देण्याची प्रक्रिया राबवावी. या मोहिमेसाठी सर्व धर्मियांचे सहकार्य लाभत असून त्याद्वारे हे शहर सुंदर बनविण्याचा सगळ्यांचा मानस आहे असेही त्यांनी सांगितले. याच मोहिमेत आता जे रस्ते महामार्ग प्राधिकरणात येतात त्यांचा विकास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री सावे यांनी सांगितले की, अतिक्रमण निर्मूलनासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रशासना सोबत आहेत. असे असतांना ही मोहिम राबवितांना लगोलग रस्त्याचे काम पूर्ण करावे. त्यास दिरंगाई करु नये. अतिक्रमणे काढल्यामुळे आता विजेचे खांब हे रस्त्याच्या मधोमध आले आहेत. ते तात्काळ हलविण्यात यावे. वीज कंपनीला त्यांच्या वाहिन्या ह्या भुमिगत करावयाच्या असल्यास त्याचाही प्रस्ताव त्यांनी द्यावा.
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी माहिती दिली की, शहर विकासआराखड्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी होत आहे. ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे त्यांचे बांधकाम पाडण्यात येणार नाही. मात्र, त्यांचे चिन्हांकन होऊन त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. रस्त्याच्या मध्यबिंदूबाबत काही ठिकाणी लोकांचे आक्षेप आहेत. तेथे नगररचना विभाग व भूमी अभिलेख विभाग हे संयुक्त मोजणी करुन नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच ही मोजणी करुन लोकांना गुंठेवारी लावून त्यांची बांधकामे नियमानुकूल करणे, भुसंपादन असल्यास ती प्रक्रिया राबविणे व संबंधितांना यथोचित मोबदला देणे ही कामे करता येतील,असेही त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त म्हणाले की, अनेक ठिकाणी जेथे प्रार्थना स्थळांची बांधकामे होती तेथे संबंधितांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सहकार्य केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी शासनाचे सर्व विभाग एकत्रितपणे राबवित आहेत. शहराचा विकास व्हावा, या उद्देशानेच ही मोहिम राबविली जात आहे.
आमदार केणेकर यांनी सांगितले की, सर्व विभागांचा समन्वय यामुळे ही मोहिम निर्विघ्नपणे राबविली जात आहे. या मोहिमेमुळे प्रामाणिक नागरिक सुखावला आहे, असे सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
आमदार जयस्वाल म्हणाले की, शहर विकासासाठी आम्ही सदैव सोबत आहोत. रस्ते चांगले व्हावेत, हे शहर सुंदर व्हावे यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत.
आमदार श्रीमती चव्हाण म्हणाल्या की, ज्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे, मिळकत कार्ड आहे, अशांचे पुनर्वसन व्हावे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी त्या जागांचा तात्काळ विकास करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
०००