बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी ३२ लाख ५९ हजार ४९७ म्हणजेच ८०.११% मतदारांनी नावनोंदणी फॉर्म (Enumeration Forms – EF) भरून सादर केले आहेत. ही लक्षवेधी कामगिरी वेळेआधीच साध्य झाली आहे.

ईसीआयनेट (ECINet) या नव्याने विकसित करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व ४० जुने अ‍ॅप्स समाविष्ट करण्यात आले आहेत आणि यामध्ये आतापर्यंत ४.६६ कोटी फॉर्म डिजिटल स्वरूपात अपलोड करण्यात आले आहेत.

राज्यात ७७,८९५ बूथस्तर अधिकारी (BLOs) कार्यरत आहेत आणि त्यांच्यासोबत २०,६०३ नव्याने नियुक्त BLOs कार्यान्वित आहेत. एकूण ३८ जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs), २४३ विधानसभा मतदारसंघांतील मतदार नोंदणी अधिकारी (EROs) आणि ९६३ सहाय्यक EROs या कामावर लक्ष ठेऊन आहेत.

या कार्यात राजकीय पक्षांनीही भाग घेतला असून १.५ लाख बीएलए (BLA) घराघरात जाऊन सर्व मतदारांची माहिती संकलित करत आहेत. ४ लाखाहून अधिक स्वयंसेवक वृद्ध, दिव्यांग व इतर संवेदनशील गटांतील मतदारांना सहाय्य करत आहेत.

२४ जून २०२५ रोजी मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत प्रत्येक मतदाराला २५ जुलै २०२५ पर्यंत EF फॉर्म सादर करावा लागेल.

ज्या मतदारांनी अद्याप पात्रता कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांनी ही कागदपत्रे ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करता येतील. हे कागदपत्र सादर करण्यासाठी स्वयंसेवकांची मदत देखील घेतली जाऊ शकते.

१ ऑगस्ट २०२५ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांना त्यांच्या नावाचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी विहित मुदतीपूर्वी फॉर्म सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ