▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल
नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा शहरातील मार्ग 18 मिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या कामठीतील रस्ता हा अतिक्रमणामुळे सात मिटर एवढाच शिल्लक राहिल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीला लोकांना सामोर जावे लागत होते. या निर्णयामुळे कामठीच्या विकासाला आता चालना मिळाली आहे. या मार्गावरील अतिक्रमण जिल्हा प्रशासन, नगरपरिषद, मेट्रो हे संयुक्तरित्या काढतील, असे बैठकीत निर्देश देण्यात आले. 1912-13 च्या सर्वेनुसार या रस्त्याची 18 मिटर मोजणी करुन अतिक्रमण काढले जाणार आहे.
कामठीत साकारणाऱ्या भव्य व्यापारी संकुलात उपलब्ध होणार व्यवसायिक गाळे
बसस्टॉप, नगर परिषद आणि तहसील कार्यालय परिसरात साकारणाऱ्या मेट्रो स्टेशनला अधोरखित करुन या ठिकाणी नझुलच्या जागेवर भव्य व्यापारी संकुलाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. या संकुलात अनेक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी दुकाने उपलब्ध होतील. याचबरोबर वाहतुकीच्या कोंडीचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.
विविध मार्गांना मंजूरी
या बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या ग्रामीण भागातील विविध मार्गाबाबत चर्चा करण्यात आली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करुन ग्रामीण भागातील या रस्त्यांसाठी लक्ष वेधले. यात खरांगना-कोंढाळी-काटोल-सावरगाव-वडचिचोली या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे, मौदा-माथनी चापेगडी कुही या राज्य महामार्गास निधी उपलब्ध करुन देणे, कारंजा-लोहारीसावंगा-भारशिंगी-खरसोली-नरखेड-मध्यप्रदेश सिमेपर्यंत या राष्ट्रीय महामार्गाच्या डी.पी.आर.ला मंजूरी देणे, नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावर निर्माणधीन उड्डाणपूलावरुन कोराडी नाक्यापासून ऑर्चिड शाळेकडे जाण्याकरीता रस्त्याचे बांधकाम करणे, श्री कोराडी महालक्ष्मी मंदिर अंतर्गत श्री महादेव टेकडी ते हनुमान मंदिर (१५१ फुट) या ठिकाणी रोप-वे च्या कामाकरीता निधी उपलब्ध करुन देणे, दहेगाव-कामठी-अजनी बडोदा-कुही या राष्ट्रीय महामार्गास निधी उपलब्ध करुन देणे, गोंडखैरी भंडारा बाहयवळण मार्गावरील सर्व्हिस रोड आणि पांजरा येथील मुख्य चौकातील रस्त्याचे बांधकाम करणे आदी मार्गांबाबत प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.
ड्रॅगन पॅलेस कामठी येथे मेट्रो स्टेशनबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. निलम लॉन व शुक्रवारी बाजाराचा विकास करतांना अस्तित्वात असलेल्या लोकांसाठी 30 टक्के जागेवर पुनर्वसन व उर्वरित जागेवर फुड कोर्ट, मॉल व इतर अत्याधुनिक सोयीसुविधा विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस आमदार सर्वश्री कृष्णाजी खोपडे, प्रविण दटके, चरणसिंह ठाकुर, मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता नंदनवार वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००