मुंबई, दि. १५ : कल्याणमध्ये तीनचाकी मालवाहू वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. या वाहनाचा क्रमांक एम एच ०५ ई एक्स १७३४ असा असून या वाहनाचा शोध घेऊन वाहनावर १४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन वाहनास चलान जारी करण्यात आले आहे. तसेच वाहन अटकावून ठेवून वाहनाच्या नोंदणी अभिलेखात ब्लॅक लिस्ट अशी नोंद घेण्यात आली आहे.
पहिले सहामाही शालेय सत्र सुरू होण्याच्या सुरूवातीपासूनच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कल्याण यांच्यावतीने शालेय वाहनांची विशेष तपासणी सुरू केली आहे. मागील दोन महिन्यात एकूण ४६१ स्कुलबस, स्कुलव्हॅनवर कारवाई करण्यात येऊन २ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. परिवहन कार्यालयामार्फत वेळोवळी शालेय वाहनांची तपासणी करण्यात येते. तसेच जिल्हा स्कूलबस समितीची व शालेय स्तरावरील शालेय परिवहन समितीची बैठक घेऊन स्कूलबस नियमावलीचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण यांनी कळविले आहे.
०००
नीलेश तायडे/विसंअ/