मुंबई, दि. १५ : राज्यातील गुणवंत, गरजू आणि प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाने ‘राज्य क्रीडा विकास निधी’ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आधीच्या १० लाख रुपयांऐवजी आता १४ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला जाणार आहे, अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री भरणे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त, क्रीडा विभागाचे सहसचिव आणि अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील खेळाडूंना आवश्यक सुविधा, प्रशिक्षण, स्पर्धा, शिबिरे आणि क्रीडा साहित्य यासाठी राज्य क्रीडा विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे. अधिकाधिक खेळाडूंना लाभ मिळावा यासाठी निधी वाढवून १४ लाख रुपयांपर्यंत केला जाईल. या निधीचा योग्य वापर करून नवोदित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षक, साधने व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/