मुंबई, दि. १५ : कोकणातील वीज पुरवठा अधिक सक्षम, नियमित व तक्रारमुक्त होण्यासाठी कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
विधानभवनात कोकण विभागातील उर्जा विभागाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रशांत ठाकूर, निलेश राणे, महेंद्र दळवी, रवीशेठ ठाकूर विद्युत विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, कोकण विभागातील वीज वितरण व्यवस्था अधिक मजबूत व्हावी, विशेषतः येणाऱ्या गणेशोत्सव काळात वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करावे.
राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चालू असलेल्या कामांची माहिती स्थानिक आमदारांना दिली जावी. कामामध्ये पारदर्शकता व सहभाग सुनिश्चित करावा. स्मार्ट मीटर संदर्भात जनजागृतीसाठी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा. नागरिकांना या योजनेचे फायदे समजावून सांगावे. वाढत्या मागणीमुळे नव्या सबस्टेशनचे नियोजन करावे. तेथील पायाभूत सुविधांचा विस्तार करावा. मनुष्यबळ वाढवावे. कोकणातील वीज विभागाच्या दुरुस्ती तसेच नवीन कामकाजासाठी दर्जेदार व कालबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी विभागातील सर्व दुरुस्ती आणि नवीन कामे ठराविक कालमर्यादेत पूर्ण करावीत. गुणवत्तेचा उच्च दर्जा राखला जावा. गणेशोत्सव व अन्य सणांसाठी वीज सुरळीत ठेवावी. उत्सव, सण काळात वीज खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी.
यावेळी उपस्थित आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील ऊर्जा विषय असलेल्या समस्या सांगितल्या.
०००
राजू धोत्रे/विसंअ