मुंबई, दि. १६ : कामगार विभागांतर्गत कार्यरत ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था या राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेमार्फत, उद्योग व आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर चौकट व शिस्तव्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमामुळे उद्योग क्षेत्राला कायदेशीर बाबी आणि शिस्तव्यवस्थापन यामध्ये निपुण मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. परिणामी बहुतांश शिस्तभंग प्रकरणे आस्थापना स्तरावरच निकाली निघतील आणि न्यायालयांवरील ताण कमी होईल, असा विश्वास कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केला.
नरिमन भवन येथे ना.मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेद्वारे प्रस्तावित ‘सर्टिफिकेट कोर्स इन लीगल फ्रेमवर्क अँड डिसीप्लीन मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाचे उद्घाटन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, उपसचिव तथा ना.मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या संचालक रोशनी कदम-पाटील, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस, कार्यासन अधिकारी दिपाली जपे, संस्थेचे उपसंचालक डॉ. अतुल नौबदे उपस्थित होते.
ही संस्था मुंबई व नागपूर येथे कार्यरत असून, श्रम विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी, पदविका व पीएचडी अभ्यासक्रम राबविते. नव्या शैक्षणिक धोरणानुसार, यापूर्वी चालू असलेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सुधारणा करून त्याचे मानवी भांडवल व कर्मचारी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी असे करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ व नागपूर विद्यापीठाच्या मान्यतेने हा अभ्यासक्रम २०२३-२४ पासून सुरु झाला आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका रोशनी कदम-पाटील यांनी दिली
नवीन शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये कौशल्याधिष्ठित अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबविण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या उद्योग व कारखान्यांमध्ये शिस्तभंग विषयक प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे थेट न्यायालयात जातात. ही समस्या टाळण्यासाठी आस्थापना स्तरावरच प्रशिक्षित अधिकारी असावेत, हा अभ्यासक्रम त्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
कालावधी – चार महिने, एकूण चार मॉड्यूल, वर्ग वेळ शनिवार किंवा रविवार, कोणत्याही शाखेतील पदवीधर या कोर्ससाठी पात्र असेल. प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर असून ऑनलाईन वर्ग सध्या नाही. विद्यापीठ नियमानुसार हा अभ्यासक्रम क्रेडिट असून यशस्वी उमेदवारास विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.
०००
मोहिनी राणे/विसंअ