मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळऑगस्ट २०२५ मध्ये संपत असल्याने विधानपरिषदेत त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार यांनी अंबादास दानवे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, “अंबादास दानवे हे परखडपणे प्रश्न मांडणारे, अभ्यासू आणि सभागृहाच्या डेकोरमचे भान राखणारे नेते होते. त्यांनी कायम सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले.”
विरोधी पक्षनेते दानवे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत भावुक शब्दांत आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. “ही संधी मला जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी मिळाली, याचे समाधान आहे,” असे त्यांनी सांगितले.
हा निरोप समारंभ जरी औपचारिक असला, तरी त्यात एकात्मता, सन्मान आणि सदिच्छा यांचा भाव पुरेपूर दिसून आला.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्यासह सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, सतेज पाटील, शशिकांत शिंदे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
०००