विधानसभा निवेदन

विदर्भातील नझूल जमीनींबाबत विशेष अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १८ : विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागात निवासी प्रयोजनार्थ भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींबाबत विशेष अभय योजना सध्या अस्तित्वात आहे. या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, याबाबत 16 मार्च 2024 रोजी शासन निर्णयानुसार निवासी प्रयोजनार्थ लिलावाद्वारे व अन्य पद्धतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनींना ही विशेष अभय योजना लागू आहे. अशा नझूल जमिनींबाबत प्रचलित वार्षिक दर विवरण पत्राच्या बाजार मूल्याच्या दोन टक्के अधिमूल्य आकारण्याची तरतूद आहे. ही अभय योजना 31 जुलै 2025 पर्यंत कार्यान्वित होती. या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देऊन 30 जुलै 2026 पर्यंत लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने घेण्यात येईल.

००००

निलेश तायडे/विसंअ