युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.

गदिमा सभागृहात पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते बारामती दरम्यान आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंह, सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, हे २१ वे शतक तंत्रज्ञान आणि प्रचंड स्पर्धेचे युग आहे. शिक्षण सर्वत्र उपलब्ध झाले असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे युवा पिढीच्या निरोगी आरोग्यासाठी सायकल, मैदानी खेळाच्या स्पर्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले पाहिजे. तसेच शिक्षणासोबतच खेळही खेळले पाहिजे. खेळामुळे मन सदृढ होऊन यश आणि अपयश पचविण्याची ताकद मैदानावर मिळते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाटचालीचे कौतुक करून श्री. पाटील म्हणाले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते बारामती दरम्यान आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावरील ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अपेक्षित यश न मिळालेल्या खेळाडूंनी हार न मानता, खचून न जाता उमेदीने, जोमाने तयारी केली पाहिजे. ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. पाटील यांनी अभिनंदन केले.

श्री. भरणे म्हणाले, सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन करण्यासोबतच सायकल वापराचे महत्त्व समाजातील घटकांना व्हावे, याकरिता पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या दरवर्षी या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येतात. जीवनात यशस्वी होण्याकरिता प्रचंड मेहनत करा, असा सल्ला यावेळी त्यांनी युवकांना दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण मंडळाची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून यापूढेही प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यासह जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत, असेही श्री. भरणे म्हणाले.

डॉ. सोनवणे म्हणाले, पुणे हे सायकलीचे शहर असल्याचे आपण म्हणतो, याच संस्कृतीची ओळख करुन देणाऱ्या या सायकल स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बारामती येथील उप केंद्राचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही श्री. सोनवणे म्हणाले.

यावेळी श्री. सिंह म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे मिशन महत्वपूर्ण असल्याने राज्यात विविध सायकल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. येत्या काळात पुणे येथे भव्यदिव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून आगामी काळात महाराष्ट्र खेळात महाशक्ती (सुपर पॉवर) होण्याकडे वाटचाल करीत आहे, असेही सिंह. म्हणाले.

मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सायकल स्पर्धेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात कि.मी. व वेळ):

घाटाचा राजा (दिवे घाट) – राष्ट्रीय स्पर्धा – मानव सारडा, राजस्थान (००.०८.०६)

घाटाचा राजा (दिवे घाट) – राज्य स्पर्धा –  सिद्धेश अजित पाटील, कोल्हापूर (००.०८.३२)

१) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीयस्तर (१२२ कि.मी.):

प्रथम क्रमांक – दिनेश कुमार, एअर फोर्स (२.२९.५४) (‘कर्तुत्वाचा वारसा, नव्या पिढीस दिशा’ स्व. प्रताप शंकर जाधव चषक), द्वितीय क्रमांक -सूर्या रमेश थाथू, महाराष्ट्र (२.३१.३३),

तृतिय क्रमांक – उदय गुलेड, कर्नाटक (२.३५.५८) याने पटकावला.

२) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर – (१२२ कि.मी.):

प्रथम क्रमांक – तांबोळी अमन राजअहमद, सांगली (२.३६.२०), द्वितीय क्रमांक – नदाफ निहाल मुसा, सांगली (२.३७.४९), तृतिय क्रमांक – चोपडे हनुमान यशवंत, बीड (२.४०.२७) याने मिळवला.

३) सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.):

प्रथम क्रमांक – शेख खुददुस, पुणे (२.०३.५९), द्वितीय क्रमांक – सोनवणे योगेश नामदेव, नाशिक (२.१०.२६),तृतिय क्रमांक – मरळ आर्यन संजय, पुणे (२.१०.३३).

४) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर  (१५ कि.मी.):

प्रथम क्रमांक – गंगा दांडीन, कर्नाटक (२२.२६.७४), द्वितीय क्रमांक- पूजा बबन दानोले, महाराष्ट्र (२२.२६.७५), तृतीय क्रमांक – श्रावणी परिट, महाराष्ट्र (२२.२६.७६).

५) सासवड ते बारामती (पोलिस / राज्य कर्मचारी) राज्यस्तरीय (८५ कि.मी.):

प्रथम क्रमांक -शिवम खरात, संभाजीनगर (२.१०.२०) द्वितीय क्रमांक – अमोल क्षिरसागर, सांगली (२.३०.०२) तृतीय क्रमांक – प्रसाद आलेकर, रत्नागिरी (२.३१.१२) याने प्राप्त केला.

६) माळेगाव ते बारामती (राज्य पोलिस/राज्य कर्मचारी महिला राज्यस्तरीय (१५ कि.मी.):

प्रथम क्रमांक – सिद्धी मनोहर वाफेलकर (००.२४.१०), द्वितीय क्रमांक – रूपाली गिरमकर (००.२४.१०) यांनी पटकावला.