मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी ! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरजू व पात्र नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाकडून रुग्णांना आर्थिक सहाय्य तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मदत देण्यात येते. पुर्वी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात होते. नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती नागरिकांना आपल्या जिल्ह्यातच व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची सुरवात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत असून 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली आहे. दिवसेंदिवस या मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्यावतीने तत्परतेने दक्षता घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण भवनच्या इमारतीत या कक्षाची स्थापना करण्यात आली असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या कक्षाचे 1 मे रोजी उद्घाटन झाले. या कक्षाच्या कार्यवाहीसाठी नोडल अधिकारी म्हणून रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे काय ? 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत राज्यातील गरजू व पात्र नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत करणे.  ही योजना  महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल आणि गरजु रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दिली जाते.

या योजनेसाठी पात्रता निकष कोणते आहेत ? 

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंबाचे चालू वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तहसीलदार यांचे चालू वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारावर मदत मिळते ? 

कॉक्लियर इम्प्लांट,  हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण,  फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्ती मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारावर मदत मिळते.

 अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?

विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो, वैद्यकीय उपचार चालू असलेल्या रुग्णालयाचे खर्चाचे अंदाजपत्रक, तहसीलदार यांचा चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे आधार कार्ड, लहान बालकांच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड, संबंधित व्याधी विचार आजाराचे संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफआयआर रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णासाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती झेडटीसीसी (ZTCC) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज कसा करावा ?

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज मिळवता येतो. आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण तपशील भरावा. अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालय मुंबई येथे ईमेलद्वारे aao.cmrf-mh@gov.in सादर करावा. त्यानंतर प्राप्त झाल्यावर कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी केली जाते. मंजुरीनंतर मदतीची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयाची कोणती अट असते ?

मान्यता प्राप्त रुग्णालय: रुग्णालय शासन मान्यताप्राप्त असावे. ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ते सरकारी (Public) किंवा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी सलंग्नित/करारबद्ध खासगी रुग्णालय (Empanelled Private Hospital) असावे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयांची यादी वेळोवेळी मुख्यमंत्री  सहाय्यता कक्ष मंत्रालय मुंबई कडून https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाते. त्या यादीतील रुग्णालयात उपचार चालू असणे आवश्यक आहे. निधीसाठी अर्ज करताना रुग्णालयाने दिलेले खर्च पत्रक (Estimate) आणि उपचारासाठीची शिफारस आवश्यक असते.

किती रक्कम पर्यंत मदत मिळू शकते ?

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करतांना रुग्णाचा आजार व उपचाराचे स्वरूप यावरून रुपये 2 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.

 रुग्णांना किती रक्कम मदत म्हणून वितरीत करण्यात आली ?                            

1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाख 99 हजार 500 रुपये एवढी रक्कम मदत म्हणून वितरीत करण्यात आली.

 मदत मिळालेल्या काही ठळक आणि सकारात्मक उदाहरणांची माहिती

नायगाव तालुक्यातील ताकाबिड येथील 24 वर्षाच्या शिवशक्ती पंढरी इंगळे यांना डोक्याला मार लागल्यामुळे व पाठीच्या कण्याचे दुखापत झाल्यामुळे या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून 1 लाख रुपयांची मदत मिळाली. ही महिला माहेरी जात असताना रस्ता अपघात घडला व बऱ्याच गंभीर दुखापती झाल्यामुळे तिला नांदेड येथील निर्मल न्युरोकेअर रुग्णालय येथे तातडीने उपचार झाल्यामुळे तिचा जीव वाचला व ती आता सुखरूप आहे.

 

उमरी तालुक्यातील सुदाम परसराम अक्कलवाड वय वर्ष 18 यांना अपघातामुळे डोक्याला दुखापत झाली होती. हा तरुण घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करीत होता. कामावर जात असताना रस्ते अपघातात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापती झाल्या. नांदेड येथील यशोसाई क्रिटीकल केअर रुग्णालय येथे त्याचावर पूर्ण उपचार होऊन तो आता सुखरूप आहे. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून 1 लाख रुपये मदत मिळाली, अशा अनेक रुग्णांना मदत मिळाली या निधीतून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे.

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मान्यता मिळाल्याचा अर्थ आणि त्याचा लाभ काय आहे?                 FCRA म्हणजे Foreign Contribution Regulation Act (परकीय योगदान नियमन अधिनियम). भारत सरकारने हा कायदा परकीय निधीचा उपयोग पारदर्शक आणि कायदेशीर राहावा यासाठी लागू केला आहे. कोणत्याही सरकारी / खाजगी संस्थेला FCRA मंजुरी मिळाल्या शिवाय परदेशातून निधी स्वीकारता येत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्यला एफसीआरएची मान्यता मिळालेली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मिळाल्याचे फायदे

आता परदेशातून मदत स्वीकारता येणार आहे. भारताबाहेर राहणारे भारतीय, विदेशी व्यक्ती, संस्था मुख्यमंत्री निधीस थेट आर्थिक मदत करू शकतात. केवळ देशातीलच नाही तर परदेशातील देणगीदारांकडूनही निधी जमा होईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर मदतकार्य शक्य होईल. नैसर्गिक आपत्ती, आरोग्य सेवा, गरीबांना वैद्यकीय मदत करण्यासाठी अधिक निधी वापरता येईल. यामुळे गुंतवणूक, विश्वास वाढेल व जागतिक स्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीची विश्वासार्हता वाढेल.

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

00000