राज्यातील गरजू नागरिकांना दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते. या निधीतून केवळ वैद्यकीय मदतच नाही, तर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या नागरिकांनाही आर्थिक सहाय्य पुरविले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागू नये म्हणून प्रयत्न केले जातात. हा कक्षाचा मुळ उद्देश आहे. सातारा जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 1 जानेवारी ते 30 जून 2025 दरम्यान 679 रुग्णांना 5 कोटी 87 लाख 99 हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात आले आहे.
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करण्यात येते. यामध्ये जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे अशांना तसेच दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक अथवा अन्य स्वरूपात, रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात, अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करण्यात येते. याचबरोबर आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी, शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशतः आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत मदत केली जाते हे या कक्षाचे उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भागातील गरजवंत गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय योजनेचा लाभ घेण्याकरीता राज्यातील मंत्रालय, मुंबई स्थित कक्षात येण्याची गरज भासू नये व सर्व अर्ज प्रक्रिया ही त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यातच त्यांना पार पाडता यावी. स्थानिक स्तरावर अर्ज दाखल केल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना पूर्तता करणे अर्जाचा पाठपुरावा करणे या बाबी सुकर व्हाव्यात. ज्यायोगे रुग्णाचा अथवा नातेवाईकांचा मुंबई कक्षाकडे होणाऱ्या प्रवासाचा व वेळेचा अपव्यय कमी करता यावा यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील दुसऱ्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कार्यरत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेची संलग्नित रुग्णालयांमधील सोयी सुविधा यांची समग्र माहिती तसेच केंद्र व राज्य शासनाद्वारा राबविण्यात येणाऱ्या इतर आरोग्य योजना व कार्यक्रम या संबंधित सर्व माहिती व संदर्भित सेवा स्थानिक पातळीवरच सहज उपलब्ध व्हाव्यात ही जिल्हास्तरीय कक्ष स्थापन करण्यामागची भूमिका आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेल्या रुग्णांना जिल्हा समन्वयक यांच्या माध्यमातून संलग्नित रुग्णालयात प्रवेशित करण्याबाबत कळवण्यात येते. धर्मदाय रुग्णालयात प्रवेशित असलेल्या रुग्णांच्याबाबतीत जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयातून जिल्ह्यातील उपलब्ध धर्मदाय शय्या संबंधित माहिती घेऊन त्यानुसार रुग्णास रुग्णालयात प्रवेशित करण्याबाबत तथा सवलतीच्या दराने अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याकरता लेखी स्वरूपात कळविण्यात येते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत 0 ते 18 वयापर्यंतच्या रुग्णांकरिता योजनेतील विहित व्याधी विकार अनुरूप मोफत उपचार केले जातात. पात्र रुग्णांना जिल्ह्यातील योजनेची संलग्नित रुग्णालयात संदर्भित करण्यात येते. उपरोक्त योजनेचा लाभ मिळू न शकणाऱ्या अर्थात या योजनांच्या निकषांच्या कक्षा बाहेरील रुग्णांनाच मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे वैद्यकीय उपचार अर्थसहाय्य दिले जाते, अशी मुख्यमंत्री सहायता कक्षाची कार्य प्रणाली आहे.
मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून मदत मिळविण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयातील रुग्णाचा जिओ टॅग फोटो, निदान व उपचारासाठी लागणारे वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक आवश्यक आहे. जर रुग्ण खाजगी रुग्णालयात असल्यास हे अंदाजपत्रक जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दराप्रमाणे करून घेणे बंधनकार आहे. तहसीलदार कार्यालयाद्वारे चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला 1 लाख 60 हजार प्रतिवर्षीपेक्षा उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे. रुग्णाचे आधार कार्ड, लहान बाळाच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड, अर्जदाराचे आधार कार्ड, संबंधित व्याधी, विकार आजाराचे संबंधित निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफ. आय. आर. रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीची मान्यतेचे कागदपत्र उपचारांसाठी आवश्यक आहेत.
कॉक्लियर इम्प्लांट, अंतस्थ कर्ण रोपण शस्त्रक्रिया ( वय वर्ष 2 ते 6), हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थी मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार, किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात (दुचाकी), लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार हृदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा अंतर्गत अर्थ सहाय्य दिले जाते.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील दुसऱ्या मजल्यावर कार्यरत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षास सातारा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या ठिकाणी भेट द्यावी. कक्षातील वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांचे सहकारी अर्थसहाय्याच्या मदतीसाठी सहकार्य करतील.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हे महाराष्ट्रातील गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उचललेले शासनाने महत्त्वाचे आणि संवेदनशील पाऊल आहे. पात्रता व निकषांच्या स्पष्टतेमुळे ही योजनेची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी सुरु आहे. या कक्षाच्या माध्यमातून मिळणारी मदत खरोखरच अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
0000