राज्यातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन लाभावे, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मोठा आधार निर्माण झाला आहे. आजकालच्या धकधकीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशा वेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दिवसेंदिवस मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
अधिक माहिती जाणून घेऊया या योजनेविषयी…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी म्हणजे काय?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना त्यांच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदत आहे.
या योजनेसाठी पात्रता निकष कोणते आहेत?
अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याची आर्थिक परिस्थिती दुर्बल असावी. ( रुपये १.६० लाख प्रती वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे). रुग्ण सरकारी/धर्मादाय/मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेत असावा.
या योजनेंतर्गत कोणकोणत्या आजारांवर मदत मिळते?
कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण(Heart Transplant), यकृत प्रत्यारोपण (Liver transplant), मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (lung transplant), अस्थीमज्जा प्रत्यारोपण ( Bone marrow Transplant), हाताचे प्रत्यारोपण ( Hand re- construction surgery), खुब्याचे प्रत्यारोपण ( Hip replacement), कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर किमोथेरपी आणि रेडिओथेरपी, अस्थिबंधन ( Surgery for ligament injury), नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण (Knee replacement), Road traffic accident (2 व्हीलर), लहान बालकाच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदू चे आजार, हृदयरोग, डायलिसिस (kidney dialysis), जळीत रुग्ण ( burn injuries), विद्युत अपघात/ विद्युत जळीत रुग्ण.
अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
डॉक्टरांचे आजारावरील प्रमाणपत्र, हॉस्पिटलचा खर्चाचा अंदाज पत्रक, उत्पन्न प्रमाणपत्र, रुग्णाचे आधार कार्ड/ लहान बालकाच्या बाबतीत हा बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधित व्याधी विकार/ आजाराच्या संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत FIR रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (ZTCC certificate), अधिवास प्रमाणपत्र ( महाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा)
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
यासाठी संबंधित रुग्णालयातून प्रस्ताव तयार केला जातो. तो वैद्यकीय अधिकारी जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठवला जातो. समिती परीक्षण करून निधी मंजूर करते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयाची कोणती अट असते?
रुग्णालय हे सरकारी, धर्मादाय संस्था चालवत असलेले किंवा शासनमान्यता प्राप्त खासगी ( Private) रुग्णालय असणे आवश्यक आहे.
एकूण किती रकमेपर्यंत मदत मिळू शकते?
आजारानुसार 2 लाखापर्यंत CMRF मधून मदत केली जाते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मान्यता मिळाल्याचा अर्थ काय? आणि त्याचा लाभ काय आहे?
एफसीआरए (Foreign Contribution Regulation Act) मान्यतेमुळे या निधीत विदेशी योगदान स्वीकारता येते. त्यामुळे अधिक निधी मिळून अधिक रुग्णांवर उपचार करता येणे शक्य होते.
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष –
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, राजवाड़ा परिसर, सांगली
एकूणच या योजनेच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांचे जीव वाचले आहेत. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या महागड्या उपचारांमुळे अनेक लहान मुलांना नवीन जीवन मिळाले आहे. कॅन्सर व हृदयशस्त्रक्रिया केलेल्या अनेक रुग्णांचे उपचार वेळेवर होऊ शकले. हा कक्ष अनेकांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आला आहे.
(डॉ. मनिषा पाटील, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, सांगली)