सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळ विकासाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. मुधाळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिराळाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले, यांच्यासह शासकीय अधिकारी आदि उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी वन विभागासह आवश्यक परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. स्मृतीस्थळ उभारण्याची कार्यवाही गतीने करून छत्रपती संभाजी महाराजांचे दर्जेदार स्मारक उभारावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या.
शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्मृतीस्थळ विकासासाठी राज्य शासन निर्णयानुसार जवळपास 13 कोटी 46 लाख रूपयांच्या विकास आराखड्यास मान्यता प्राप्त आहे. यामधील रक्कम व बाबनिहाय कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. पाटील यांनी अनुषंगिक सूचना केल्या. स्मृतीस्थळ आराखड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, मुख्य प्रवेशद्वार, जीवनपट दर्शवणारा वाडा, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, अग्निशमन व्यवस्था, पार्किंग आदि बाबींचा समावेश आहे.
दरम्यान यावेळी माजी मंत्री दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकाच्या कामासंदर्भातही आढावा घेण्यात आला.
00000