पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण

सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : पोलीस दलास अत्याधुनिक सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असून अधिकचा निधी देऊन पोलीस दल आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 च्या निधीतून विस्तारीकरण केलेल्या सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचा पहिला मजला विस्तारीकरण व परिसर सुशोभिकरण कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, सांगली शहरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम., पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, अपर तहसीलदार सांगली अश्विनी वरुटे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गत काही महिन्यात अमली पदार्थ विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविल्यामुळे काही गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे व पोलिसांचा चांगला धाक निर्माण झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसण्यासाठी सीसीटीव्ही जरूरीचे आहेत. पोलिसांनी सदैव सतर्क, दक्ष राहून कामकाज करावे. सांगली पोलीस दलाअंतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या विस्तारीत इमारतीच्या माध्यमातून दुय्यम पोलीस अधिकारी यांना कामकाज करण्याकरिता सोय होणार आहे. तसेच सीसीटीव्ही सर्व्हेलन्स वायफाय कॅमेराच्या माध्यमातून चौकशीकामी येणारे तक्रारदार, तसेच पोलीस यंत्रणेच्या कामकाजावरही लक्ष ठेवण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांचे कामकाजाकरिता उपलब्ध असलेल्या बैठक व्यवस्थेमधील इमारतीच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव सन २०२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे सादर प्रस्तावाप्रमाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांच्यासाठी बैठकव्यवस्था असलेल्या इमारतीचे विस्तारीकरण करुन सर्व दुय्यम पोलीस अधिकारी यांचेकरिता स्वतंत्र कक्ष व सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र अभ्यागत कक्ष करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जवळपास 12 लाख 28 हजार रूपयांची तरतूद करण्यात आली.

सीसीटीव्ही सर्व्हेलन्स वायफाय कॅमेरा

पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेमध्ये ठाणे अंमलदार कक्षामध्ये सीसीटीव्ही सर्व्हलन्स वायफाय कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने पहिला सीसीटीव्ही सर्व्हेलन्स वायफाय कॅमेरा सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथील ठाणे अंमलदार यांच्या कक्षामध्ये बसविण्यात आला असून हा कॅमेरा 24 तास सुरु राहणार आहे. या कॅमेऱ्याचेही लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जनता व पोलीस यांच्यात होणारा सुसंवाद व नागरिकांशी पोलिसांची वर्तणूक पोलीस अधीक्षक पाहणार आहेत. गैरतक्रारींवर वचक बसून, नागरिकांची विनाविलंब तक्रार घेता येणार आहे. तसेच नागरिकांना विनाकारण पोलीस ठाण्यात थांबविण्यावर आळा बसणार आहे. पीडित महिला व वयोवृध्द यांच्या तक्रारी तात्काळ दाखल करुन घेणे, तसेच महिला वयोवृद्ध नागरिक यांच्यासोबत सौजन्यपूर्ण संवाद राहण्यास मदत होणार आहे. हा सीसीटीव्ही सर्व्हेलन्स वायफाय कॅमेरा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला असून, यासाठीचा खर्च शासकीय कार्यालयीन खर्चामधून करण्यात आला आहे.

प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस हेल्पलाईन क्रमांकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

 

0000