मुख्यमंत्री सहाय्यता निधी:  गरजू रुग्णांसाठी आधारवड

एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला गंभीर आजार होतो, तेव्हा त्या कुटुंबावर एक प्रकारचा आघात होतो. त्यावेळी ते कुटुंबे केवळ शारीरिक आणि मानसिक त्रासानेच नव्हे, तर आर्थिक अडचणींनीही खचून जातात. अनेकदा उपचारांचा खर्च खूप येत असल्याने गरीब रुग्ण हतबल होतात. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्री सहाय्यता निधी (Chief Minister’s Assistance Fund) गरजू रुग्णांसाठी एक आधारवड ठरतो.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी तसेच शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण आणि कर्करोगासारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी या निधीतून मदत मिळते.

* एक जीवनदायी योजना-

     मुंबई सार्वजनिक विशेष अधिनियम १९५० अंतर्गत “मुख्यमंत्री सहायता निधी” या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली याचे व्यवस्थापन केले जाते. मा. मुख्यमंत्री या मुख्यमंत्री सहायता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात.

*उद्दिष्टे –

  * राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.

  • जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

*मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विनियोगासाठीचे उद्देश-

                                                                                                                                                            विविविध आपत्तीतील आपद्ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा प्रमुख उद्देश असला तरी, नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त खालील विविध बाबींकरीता निधीचा विनियोग करण्यात येत असतो.               ११.नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, पूर व भूकंप इत्यादी.)

२. जातीय दंगल व बॉम्बस्फोट इत्यादी आपत्तीमध्ये शासनाच्या योजनेतून नियमानुसार देण्यात आलेल्या मदती व्यतिरिक्त अशा प्रकरणी मा. मुख्यमंत्री महोदंयानी अर्थसहाय्याची अनुकुलता दर्शविली असेल तर, आपदग्रस्तांना मदत होण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे.

३. रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना त्यांचेवर करावा लागणाऱ्या खर्चापोटी अंशत: अर्थसहाय्य  उपलब्ध करणे.

आकडेवारी काय सांगते?

जानेवारी ते जून २०२५ या काळात, या योजनेअंतर्गत २३ हजार २६९ गरीब रुग्णांना एकूण १४८ कोटी ६० लाख रुपयांची मदत देण्यात आली. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १४ हजार ६५१ रुग्णांना १२८ कोटी ६ लाख, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून ८ हजार ५०७ रुग्णांना १५ कोटी २४ लाख मदत करण्यात आलेली आहे.

*सुधारित कार्यपद्धती

या निधीच्या कार्यात अधिक सुधारणा करण्यासाठी काही नवीन बदल करण्यात आले आहेत:

*परकीय मदतीचा मार्ग खुला: मुख्यमंत्री सहाय्यता निधीला परदेशी देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.

*’चरणसेवा’ उपक्रम: वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा पुरवण्यात आली.

*उत्पन्न प्रमाणपत्र पडताळणी: अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्यांची ऑनलाइन पडताळणी सुरू.

*धर्मादाय रुग्णालयांचे परीक्षण: धर्मादाय रुग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या मोफत उपचारांची तपासणी.

निधीची प्रक्रिया

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही.

*उपचार सुरू असतानाच मदतीसाठी अर्ज करता येतो.

*प्रथम महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना किंवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये संपर्क साधावा.

*हे पर्याय उपलब्ध नसल्यास, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळू शकते.

*कोणत्या आजारांचा समावेश आहे?

या योजनेत वीस गंभीर आजारांचा समावेश आहे. ज्यात हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि हाडांचे प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, बालरोग, मेंदूविकार, हृदयविकार, डायलिसिस, जळीतग्रस्त आणि नवजात शिशुंच्या उपचारांचा समावेश आहे. उपचारांसाठी २५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.

अर्ज कसा करावा?

*   विहित नमुन्यातील अर्ज

*   उपचार खर्चाचे प्रमाणपत्र

*   रुग्ण दाखल असल्याचा जिओ टॅग फोटो

*   उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड

*   वैद्यकीय चाचणी अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे

अर्ज aao.cmrf-mh@gov.in वर पाठवा आणि कागदपत्रे पोस्टाने पाठवा. अधिक माहितीसाठी 022-22026948 / 9049789567 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा cmrf.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

     मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे गरीब रुग्णांना केवळ आर्थिक मदतच मिळत नाही, तर त्यांना एक प्रकारचा आर्थिक आधारवड मिळत असून रुग्ण व त्याच्या कुटुंबाची आर्थिक परवड या निधीमुळे थांबली जात आहे.

                                                            सुनील सोनटक्के

                                                             जिल्हा माहिती अधिकारी,

                                                              सोलापूर.