मुंबई, दि. २१ :- राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या योजना उपक्रमाबरोबरच सामान्य माणसाला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गांधार फाउंडेशनतर्फे डीएचएल पार्क, गोरेगाव पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कोणताही रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, त्याला वेळेत उपचार मिळावेत हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. किडनी विकार असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी गांधार फाउंडेशनने मोफत डायलिसिस सेंटर सुरू करून आरोग्यसेवेत उचलेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत मोफत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्ण सेवेचा घेतलेला हा वसा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गांधार फाउंडेशनमार्फत या डायलिसिस सेंटरमधून दररोज 30 रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आमदार विद्या ठाकूर आणि आमदार योगेश सागर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात गांधार फाउंडेशनच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 21 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार विद्या ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, गांधार ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन रमेश पारेख, डॉक्टर श्याम अग्रवाल, समीर पारेख आदी उपस्थित होते.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/