महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

'विकसित महाराष्ट्र २०४७' साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाची कार्यशाळा; कार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेवून सर्वसमावेशक धोरण अमलात आणेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मार्फत ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ तज्ञ कार्यशाळा झाली. यावेळी विविध सामंजस्य करार देखील करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी, ‘मित्रा’चे अतिरिक्त मुख्याधिकारी अमन मित्तल आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेसाई, वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रमुख, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, बहुराष्ट्रीय संस्था आणि विकास भागीदार सहभागी झाले होते.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की,जागतिक पातळीवरचे उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले तर रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. यासाठी कौशल्य विकास विभाग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाशी भागिदारी करत आहे.स्थानिक विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार मिळण्यासाठी हे विचारमंथन खूप गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित महाराष्ट्र २०४७ साठी कौशल्य विकास विभाग सज्ज – अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सादरीकरण केले. “विकसित महाराष्ट्र २०४७” या संकल्पनेच्या दिशेने कौशल्य विकास विभाग पूर्णपणे तयार असून यामध्ये सर्व सहभागी संस्थांचा देखील पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “विकसित महाराष्ट्र २०४७” या संकल्पनेच्या दिशेने २०२९, २०३५ व २०४७ या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कौशल्य विकासासाठी अनुरूप वातावरण तयार करणे, काळानुरूप कौशल्य विकास अभ्यासक्रमात बदल करणे, ‘आयटीआय’चे काळानुरूप अभ्यासक्रम उद्योगाभिमुख रूपांतरण, कौशल्य विद्यापीठाचे बळकटीकरण तसेच सर्वसमावेशक उद्योजकता यावर विस्तृत सत्र घेण्यात आले. या बैठकीत संस्था सशक्तीकरण उपक्रम, आंतरराष्ट्रीय रोजगार संधी, तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म, उद्योजकता मॉडेल्स आणि पी. पी. पी. धोरणाअंतर्गत आय. टी. आय. चे उद्योगाभिमुख रूपांतरण यावर सखोल चर्चा झाली. हे सत्र विभागाच्या भविष्यातील धोरणांसाठी मार्गदर्शक ठरले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे पाच सामंजस्य करार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  विभागासोबत कॉन्सुलेट जनरल ऑफ फिनलंड आणि  यांचा स्टार्टअप एक्सचेंज, नवप्रवर्तन इकोसिस्टिम आणि द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी, गती फाउंडेशनशी आंतरराष्ट्रीय रोजगार मार्ग निर्माण व राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट एजन्सी साठी,  तांत्रिक सहाय्यसाठी, मॅजिक बिलियनचा आरोग्य आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील जागतिक नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण व भरती साठी सहकार्य करतील.चारकोस इंटरप्राईजेस हे परस्पर सहकार्याने- कुशल आरोग्य सेवा व्यावसायिकांचे परदेशी प्लेसमेंट व लक्षित प्रशिक्षण देतील. अपग्रेड, स्वदेश फाउंडेशन आणि अटलास स्किल युनिव्हर्सिटी यांचा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सोबत सामंजस्य  करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकर मुलींच्या आय. टी. आय. दादर संस्थेला १० वर्षांसाठी दत्तक घेवून विकास करण्यात येणार आहे.

कार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग

कार्यशाळेत यूएन वुमन, युनिसेफ, यूएनडीपी, वर्ल्ड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा आयआयएस, केपीएमजी, जनरेशन इंडिया, मित्रा, प्रथम फाउंडेशन, फिक्की, सीआयआय मानदेशी फाउंडेशन, उद्याती, लेंड अ हँड इंडिया, सहभागीता, टाटा स्ट्राईव्ह, राईटवॉक फाउंडेशन, लाइटहाऊस फाउंडेशन यांच्या प्रतिनिधींनी कौशल्य प्रशिक्षण व विकास आणि  सर्वसमावेशक प्रगतीसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी जर्मनीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी निवड झालेल्या ITI व अन्य संस्थांतील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

००००

संध्या गरवारे/विसंअ/