मुंबई, दि. २२ : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कार्यरत राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
१०० विद्यार्थ्यांची मंजूर क्षमता असलेल्या वसतीगृहात सध्या ४४ जागा रिक्त असून, त्या प्रवर्गनिहाय पुढीलप्रमाणे आहेत, अनुसूचित जाती ३७, अनुसूचित जमाती १, विमुक्त जाती भटक्या जमाती १, आर्थिकदृष्ट्या मागास १, विशेष मागास प्रवर्ग १, दिव्यांग २, अनाथ १ या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे पालक मुबंई महापालिका हद्दीत स्थानिक नाहीत अशा कनिष्ठ महाविद्यालयात व आयटीआय अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार व नियमांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, नाश्ता व भोजन, बेडिंग साहित्य, ग्रंथालय व संगणक सुविधा (इंटरनेटसह) मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच व क्रीडासाहित्य या सुविधा मोफत पुरविण्यात येतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दरमहा ८०० रुपये निर्वाह भत्ता तसेच शैक्षणिक साहित्य, प्रकल्प खर्च, गणवेश, शैक्षणिक सहल नियमानुसार देय रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. ऑनलाइन भरलेला अर्ज पोर्टलवरून डाउनलोड करून प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह वसतीगृहात किंवा सहाय्यक आयुक्त कार्यालयात ऑफलाइनरित्या सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतीगृह, ठाकूर कॉम्प्लेक्स,व्हिडीओकॉन टॉवरच्या समोर, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ या ठिकाणी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
****
शैलजा पाटील/विसंअ/