बुलढाणा, दि. २१ : गरजू आणि गोरगरीब रुग्णांसाठी दिलासा ठरणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून बुलढाणा जिल्ह्यातील 348 रुग्णांना 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत सुमारे 2 कोटी 89 लाख 4 हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित असलेल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे नागरिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचा मोठा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेतून राज्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना महागड्या आणि दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी थेट आर्थिक मदत दिली जात आहे. पूर्वी रुग्णाच्या नातेवाईकांना मुंबईपर्यंत जाऊन अर्ज सादर करावा लागत असे, मात्र आता जिल्हाधिकारी कार्यालयातच हा कक्ष स्थापन केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाच्या अंदाजपत्रकाची मूळप्रत, डॉक्टरांच्या सही व शिक्क्यासह खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे, तहसिलदार कार्यालयाचा 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे आधार कार्ड, नवजात बाळासाठी आईचे आधारकार्ड आवश्यक आहे. रुग्णाचे महाराष्ट्र राज्याचे रेशन कार्ड, संबंधित आजाराचे रिपोर्ट, रुग्णाचा पासपोर्ट फोटो, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी/ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. रस्ते अपघात असल्यास एफआयआरची प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच संबंधित रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे बंधनकारक आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत कॉकलियर इम्प्लांट, कर्करोग, अपघात, हृदयरोग, यकृत, किडनी, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हिप आणि गुडघा प्रत्यारोपण, डायलिसिस, रेडिएशन, नवजात शिशुंचे आजार, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण अशा विविध दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंतची मदत दिली जाते.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रूग्णालय हे नोंदणीकृत असणे गरजेचे असून संबंधित रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक आहे. रूग्णालयामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना/आयुष्यमान भारत योजना/धर्मदाय रूग्णालय/आरबीएसके इत्यादी योजना कार्यान्वित असल्यास या योजनांमधून रूग्णाचा उपचार होणे बंधनकारक आहे व रूग्णाचा आजार या योजनेमध्ये बसत नसल्यास तसे प्रमाणपत्र खर्चाच्या अंदाजपत्रकासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच रुग्णाला डिस्चार्ज होण्याच्या पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षामार्फत या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अर्जाचा विहीत नमुना आणि योजनेविषयी सविस्तर माहिती https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
“जिल्ह्यातील गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचार घेण्यात अडथळा येत असेल, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे त्यांना मदत मिळू शकते. त्यामुळे गरजूंनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विलंब न लावता सर्व कागदपत्रांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात अर्ज सादर करावा, आणि या उपक्रमाचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
0000