मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष : जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना गरजूंना दिलासा देणारे कार्य

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून तसेच मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या सक्रिय सहभागातून सुरु झालेला आहे. ही जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना असून यामार्फत गरजूंना दिलासा देणारे कार्य शीघ्रतेने सुरु आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर  उपचार करण्यासाठी या योजनेतून अर्थसहाय्य पुरविले जाते. राज्यातील तसेच देशातील  आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्य देणे, हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उदिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठया नैसर्गिक आपत्तींमुळे  बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

 अमरावती जिल्हयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे औपचारिक उद्घाटन 1 मे 2025 रोजी करण्यात आले असून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यरत आहे. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीतील या कक्षामार्फत यशस्वीरित्या कार्य चालू आहे. यात एकूण लाभार्थी रुग्ण 173 असून यांच्या उपचारासाठी  एकूण 1 कोटी 69 लक्ष 15 हजार रुपये निधीचे वितरण करण्यात आले. या कालावधीत विविध गंभीर आजारांवर उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा अंतर्गत जिल्ह्यातील 66 नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष योजनेतंर्गत कोक्लेअर इम्प्लांट, हार्ट, लिव्हर, किडनी, लंग, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हँड री-कन्स्ट्रक्शन, हिप,नी रिप्लेसमेंट,  कॅन्सर सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, नवजात अर्भकांचे विकार, अपघात व विद्युत जळीत, डायलिसिस, हृदयरोग, लिगामेंट सर्जरी, बालकांच्या शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा समावेश आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्याचा जिओ-टॅग फोटो, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणित अंदाजपत्रक, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजारापेक्षा कमी असणे आवश्यक)  आधार व रेशन कार्ड, संबंधित निदान, उपचाराची कागदपत्रे, अपघात असल्यास एफआयआर, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी अधिकृत प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. ई-मेलद्वारे अर्ज सादर करण्यासाठी aao.cmrf-mh@gov.in  या मेल आयडीवर मेल करावे. अथवा रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक वरील ईमेलवर सर्व कागदपत्रांसह पीडीएफ स्वरूपात अर्ज सादर करू शकतात. आवश्यकतेनुसार संबंधितांनी कक्षाशी थेट संपर्क साधावा.

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष योजनेत पुढील बाबींचा समावेश नाही. जसे राज्याबाहेरील रुग्णालयातील उपचार, योजनेच्या व्याप्तीतील नसलेले आजार, आधीच डिस्चार्ज झालेल्या किंवा उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत अर्थसहाय्य नाही. पूर्वी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मंत्रालय, मुंबई येथे जावे लागत होते.  आता मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन झाल्याने, सर्व आवश्यक प्रक्रिया, मार्गदर्शन व मदत स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध झाली आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचून गरजूंना त्वरित मदत मिळविणे शक्य झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉ. श्याम सुरेश गावंडे  यांनी सांगितले.

                                                                                                                             अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती.