धुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : पालकमंत्री जयकुमार रावल

????????????????????????????????????

धुळे, दि. 23 जुलै (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणवळणाच्या सुविधांमार्फत जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी रस्ते, पुल, नवीन शासकीय इमारतीचा सुसंगत आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे  निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची बैठक पालकमंत्री श्री.रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत येलाई, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सोनार, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर यांच्यासह बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 150 दिवसांच्या सेवाकालीन कार्यक्रमांतर्गत भविष्यवेध घेणारे विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट राज्य शासन तयार करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘धुळे जिल्हा विकास योजना’ आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम विभागाने  धुळे जिल्ह्यातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, शहरांतील अंतर्गत रस्ते तसेच नवीन प्रस्तावित रस्ते, पुल, नवीन शासकीय इमारत, प्रस्तावित बांधकांमाचा समावेश असलेला तसेच आवश्यक त्या दुरुस्ती कामांचा स्थांनिक लोकप्रतिनिधींशी चर्चा, अभ्यास करून सुसंगत, दीर्घकालीन रस्ते विकास आराखडा तयार करावा.

हा आराखडा तयार करतांना संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. जिल्ह्यात ज्या ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे झाली नाहीत त्यांचा शोध घेवून पाणंद रस्ते तयार करावे. जिल्ह्यात नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण करुन मुख्य मार्गांशी जोडण्यासाठी आराखडा तयार करावा. धुळ्यातील मोठ्या पुलाच्या शेजारी नवीन पुल बांधण्यात यावा. नवीन पुल बांधतांना दिर्घकाळ टिकण्यासाठी दर्जात्मक कामे करावीत. तापी नदीवरील गिधाडे पुलावर चेअरींग जाळी लावण्यात यावीत. शासकीय इमारतींचे  नवीन बांधकाम करतांना  सुसज्ज असा आराखडा तयार करुन त्यात सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने बांधावीत. नवीन इमारती बांधतांना हेरीटेज इमारतीचे संवर्धन करावे. दोंडाईचा येथे 100 खाटांचे रुग्णालय बांधकामाचा आराखडा तयार करावा. राष्ट्रीय महामार्गावर नवीन विश्रामगृहाचे काम प्रस्तावीत करावे.

नवीन तसेच जुने रस्ते दुरुस्तीसाठी कंत्राटदाराना वेळोवेळी सूचना द्याव्यात. जे कत्रांटदार विहित कालावधीत काम करणार नाहीत, त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावेत. रस्ते, पुल, इमारतीच्या ठिकाणी कामांचे फलक लावण्यात यावेत. बांधकाम विभागाने नवीन रस्त्यांच्या कामांची नियमित पाहणी करावी. रस्त्यावरील अपघात क्षेत्राची पाहणी करुन आवश्यक ती दुरुस्तीसह दिशादर्शक लावावेत. रस्ते, पुल, इमारती कामांसाठी विविध लेखाशिर्षातंर्गत निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करावा. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने  नवीन ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी, शाळा, स्मशान भूमीची नवीन कामे करतांना आवश्यक भौतीक सुविधा देण्यात याव्यात. यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.रावल यांनी दिल्यात.

बैठकीत मागील 5 वर्षांत झालेल्या कामांची माहिती, सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती व भविष्यात करावयाची कामांची विस्तृत माहिती, शहर, तालुका, गावातील नवीन इमारती, पुल, रस्ते, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या व प्रस्तावीत कामांची माहिती  पालकमंत्री श्री.रावल यांनी संबंधित विभाग प्रमुखाकडून घेतली.

यावेळी जिल्ह्यात बांधकाम विभागामार्फत विविध योजनेतंर्गत सुरू असलेल्या, प्रस्तावित कामांची माहिती संबंधित विभागप्रमुखांनी बैठकीत दिली.

000000