यशदा येथे आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्यासह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. आबिटकर म्हणाले, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाच्या योजना आहे. धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत जिल्ह्यात विविध रुग्णालये नोंदणीकृत असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आजारपणाच्या काळात सकारात्मक पद्धतीने मदत करण्याची भावना ठेवावी. त्यांची सेवा करण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.
धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी तत्परतेने काम करावे, शासनाच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना खाटा उपलब्ध करुन द्याव्यात.
पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या तसेच वैद्यकीय उपचाराकरिता येणाऱ्या खर्चाचा विचार करता धर्मादाय रुग्णालयाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, सेवा दिल्यानंतर रुग्णाच्या मनात रुग्णालयाप्रती समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे, यादृष्टीने काम करावे, असेही श्री. आबिटकर म्हणाले.
डॉ. शेटे म्हणाले, शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयांनी पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावे, याकामात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावी, असेही डॉ. शेटे म्हणाले.
राज्य कामगार विमा रुग्णालयाची पाहणी
पिंपरी-चिंचवड मोहननगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषधी भंडार,आहार कक्षाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. येथील रुग्णांशीही संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.
रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरिता डॉक्टर व प्रशासनानी काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात, अशा सूचना श्री. आबीटकर यांनी केल्या.