सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व
नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे निर्देशही दिले.
एमआयडीसी येथील मास भवन येथे सर धनाजीशा कूपर सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण संचालनायातील प्राचार्य व कर्मचाऱ्यांचा जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. या जनसंवाद कार्यक्रमास आमदार मनोज घोरपडे, कौशल्य विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, प्रिया शिंदे, विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.
विविध संस्थांच्या व शासनाच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सेायी-सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे, असे सांगून मंत्री श्री. लोढा म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील प्रत्येक तरुण तरुणींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या जर्मन शेडची उभारणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी बाह्यस्थ प्रशिक्षकांरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. या शिक्षकांना वाढीव मानधही देण्यात येणार आहे. यातून युवक रोजगारक्षम झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे.
अनेक वर्षापासून ताशी मानधन तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. जे शिक्षण परीक्षेत पास होतील त्यांना जागी कायम स्वरुपी ठेवण्यात येईल. जनसंवाद कार्यक्रमामध्ये देण्यात आलेल्या निवेदन व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मंत्री लोढा यांनी दिली.
जनसंवाद कार्यक्रमामध्ये मांडण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्न मंत्री महोदय सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा आमदार श्री. घोरपडे यांनी व्यक्त केली.
000000