गडचिरोलीत कृषिभवन उभारण्यास मान्यता – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण व्हाव्यात, कृषी विषयक सेवा एका छताखाली मिळाव्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा या व्यापक हेतूने गडचिरोलीत नवे कृषिभवन इमारत बांधकामास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

या प्रकल्पासाठी ११.६७ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, हे भवन सोनापूर येथील फळरोपवाटिकेच्या जागेत उभारले जाणार आहे. या निर्णयामागे शेतकऱ्यांना तातडीने, प्रभावी व आधुनिक सेवा मिळाव्यात हा मूळ उद्देश आहे. कृषी विभागाची जिल्हा व तालुक्यामधील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असावीत, जेणेकरून कामकाजात सुलभता येईल आणि शेतकरी आणि प्रशासनाच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी सोनापूर कॉम्प्लेक्स, ता. व जि. गडचिरोली येथे नवीन कृषिभवन इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत्तचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. नव्याने होणाऱ्या कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा तसेच शेतकरी प्रशिक्षण गृह याचा या बांधकामामध्ये समावेश असणार आहे. या कामासाठी ११ कोटी ६७ लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि.२२ जुलै २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

00000

संध्या गरवारे/विसंअ/