सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. 24 :- विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास हेच शासनाचे उद्दिष्ट असून शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता आणि आधुनिकतेचा समन्वय साधला जावा. यासाठी या सर्व शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाने सुयोग्य नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी, मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी या विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, उपसचिव समीर सावंत, उपसचिव तुषार महाजन आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/