अणुशक्तीनगर येथे तालुका क्रीडा संकुल उभारणीच्या प्रक्रियेस गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • अल्पसंख्याकांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी योजना प्रभावीपणे राबवा
  • अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीस गती

मुंबई, दि. २४ : अणुशक्तीनगर येथे म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असलेल्या १०,३३३.९१ चौ.मी. क्षेत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामास गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अणुशक्तीनगर येथे म्युन्सिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणेबाबत तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध समस्यांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार  म्हणाले की, मुंबई शहरात क्रीडापटूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व प्रशिक्षण देण्यास हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स महत्वाचे ठरणार आहे. संबंधित भूखंड हा  म्युनिसिपल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षित असल्याने, यापूर्वी त्या जागेसंदर्भात दि चिल्ड्रन एड सोसायटीसोबत असलेले भाडेकरार संपुष्टात आणावे. यासंदर्भात महसूल विभागाशी समन्वय साधून सदर भूखंड हा महानगरपालिकेकडे क्रीडा संकुल उभारणीसाठी हस्तांतरित करावा. तसेच या जागेवर अतिक्रमण असल्यास ते निष्कासित करण्यात यावे. या क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसह क्रीडा संकुल उभारावे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अल्पसंख्याक समाजाच्या मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय

मौजे अनिक, चेंबूर येथे शैक्षणिक संस्थेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अल्पसंख्याक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासंदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.  महाविद्यालय निर्मितीनंतर आवश्यक शैक्षणिक पदांची निर्मिती, पदभरती, देखभाल दुरूस्ती याचीही तरतूद करण्यात यावी. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे असलेले अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे. मान्यता असलेल्या ११ पदांची भरती तत्काळ करावी.

अल्पसंख्याकाच्या सामाजिक, शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना राबविण्यात यावी. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दरवर्षी शैक्षणिक कर्ज योजनेसाठी विद्यार्थ्यांची मर्यादा ठरवावी, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजातील मुलांना उच्च व परदेशी शिक्षण घेता यावे यासाठी सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. अल्पसंख्याकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.

यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख,महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे, क्रीडा आयुक्त शीतल तेली, उपसचिव सुनील पांढरे, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, उपाध्यक्ष जावेद शेख, अल्पसंख्याक विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ग.पी.मगदूम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/