मुंबई, दि. २४ : महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुख हिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली आहे. दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनग्यी हिला पराभूत केले. यासह ती महिला ‘कॅंडिडेट्स’ स्पर्धेत पात्र ठरली आहे. या ऐतिहासिक दुहेरी कामगिरीसाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात, “दिव्या देशमुख हिने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ती बुद्धिबळातील भारताची नवीन आशास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि बुद्धिमत्तेला सलाम. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! दिव्याचे यश हे देशातील प्रत्येक युवक-युवतीसाठी प्रेरणादायी आहे.”
विशेष म्हणजे, दिव्या देशमुखने गतवर्षी कनिष्ठ गटात महिला विश्वचषकावर नाव कोरले होते. ही घोडदौड कायम ठेवत तिने यंदा वरिष्ठ स्तर स्पर्धेत अव्वल कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे.
00000