संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित

संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य – उपमुख्यमंत्री 

सोलापूर/पंढरपूर, दिनांक २४ : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे चालते बोलते विद्यापीठ आहे. संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्र बाहेर नेली, रुजवली व वाढवली. त्यामुळे वारकऱ्यांना देशभर प्रतिष्ठा आहे. तसेच वारीच्या माध्यमातून देशभरातून लाखो भाविक पंढरपूरात येतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व सेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (675 वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून  संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी सर्वश्री आमदार समाधान आवताडे, अभिजीत पाटील, उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख, विश्वस्त, फडकरी, जेष्ठ कीर्तनकार मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. तसेच हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना व्यक्त केली. हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले.

शेतकरी व वारकरी यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे. शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून, महाराष्ट्रातील तमाम साधू-संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असेही श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हा सगळा विकास लोकांना विश्वासात घेऊन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र विकास व संस्कार केंद्रांचा महत्त्व

महाराष्ट्रातील प्रत्येक तीर्थक्षेत्राला सरकारने देणगी दोन कोटी रुपयांवरून पाच कोटीपर्यंत वाढवली आहे. मंदिरांना संस्कार केंद्र मानून महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला. तसेच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत वारकऱ्यांच्या गरजांवर अधिक प्रभावीपणे काम केले जाणार आहे, अशी माहिती श्री शिंदे यांनी दिली. तसेच पांडुरंग आपल्या प्रत्येक वारकऱ्यात आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली आणि धर्मरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगितले. संत नामदेवांनी भक्तीबरोबरच ज्ञानाचा प्रसार केल्यामुळे त्यांची शिकवण देशभर पसरली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संतांचे विचार आणि वारकरी संतरंपरा हीच महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हेच आपले कर्तव्य असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी म्हटले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केशवराज यांचे दर्शन घेतले व त्यानंतर नामदेव महाराजाच्या वंशज  यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी त्यांना पगडी विना तसेच सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थांच्या वतीने देण्यात आलेला श्री भक्त शिरोमणी नामदेव महाराज हा पहिलाच पुरस्कार श्री. शिंदे यांना देण्यात आलेला आहे.

अक्षय महाराज भोसले यांनी प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व त्यांचे वंशज यांच्या परंपरेंची व कार्याची माहिती दिली तसेच हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश सांगितला. यावेळी ह. भ.प. चैतन्य महारज देगलूरकर, राणा महाराज वासकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

 0000