अमरावती, दि. २४ : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सर्व अनुषंगीक बाबी, सोयी-सुविधा संदर्भात अचूक नियोजन करुन ठेवावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा श्री. वाघमारे यांनी विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्य अधिकारी अ. गो. जाधव, जिल्हाधिकारी आशिष येरेकर (अमरावती), अजित कुंभार (अकोला), डॉ. किरण पाटील (बुलडाणा), श्रीमती बुवनेश्वरी एस. (वाशिम), यवतमाळचे प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपायुक्त संतोष कवडे यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हा परिषद व नगरपालिका प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. वाघमारे यांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती विभागाचा निवडणूक पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाढ झालेल्या मतदारांची संख्या, मतदान केंद्राची संख्या अनुरुप मनुष्यबळाचे नियोजन करावे. मतदान केंद्रावर महिला निवडणूक अधिकारी-कर्मचारी व मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिलचेअर आदी सुविधांची उपलब्धता प्रत्येक मतदान केंद्रावर करुन ठेवावी. मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रशासनाने सुविधा न केल्याने मतदानाचा टक्का कमी झाला, अशी तक्रार येता कामा नये. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
ईव्हीएम मशीन उपलब्धता यादृष्टीने जिल्ह्यांनी सर्वप्रथम त्यांच्याकडील मशीनची प्रथम स्तर तपासणी (एफएलसी) करुन घ्यावी व त्यानुषंगाने कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व अनुषंगीक बाबींची दुप्पट प्रमाणात उपलब्धता करण्यात यावी. ज्या जिल्ह्यात अधिक ईव्हीएम मशीन असेल त्यांनी लगतच्या जिल्ह्यांची मागणी पूर्ण करावी. निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी लागणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आयोगाला त्यासंदर्भात एकत्रित मनुष्यबळाची मागणी कळविण्यात यावी. निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ घेताना, त्यासंबंधीचे नियुक्ती आदेश निर्गमित करताना आयोगाच्या दिशा-निर्देशांचे काटेकोर पालन करण्यात यावे. अनुभवी मास्टर ट्रेनर यांची नेमणूक करुन प्रशिक्षणाचे आयोजन करुन निवडणूक प्रक्रिये संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. दि. 1 जुलै 2025 या अर्हता दिनांकावर मतदार यादी निश्चित करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादी व विभाजन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री. वाघमारे यांनी यावेळी दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुका राज्यात होणार आहेत. यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व बाबींची पूर्तता होण्यासाठी अचूक नियोजन करावे. ग्रामीण व शहरी भागातील सर्व मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रावर मतदार यादी तसेच सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मतमोजणीसाठी तालुकास्तरावर पुरेशी जागा असलेले गोडावून उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करावे. निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, असे आयोगाचे सचिव श्री. काकाणी यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करुन विभागात निवडणूका सुरळीत पार पाडल्या जातील, असे यावेळी सांगितले आणि पूर्व तयारीचा आढावा दिला. यावेळी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारी संदर्भात सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.
0000