मुंबई दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून ‘उपजीविका विकास कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रिय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यास शासन प्राधान्य देत आहे. शासनाच्या या धोरणाला प्रतिसाद देत अॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत काम सुरू झाले आहे. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन, उपजीविकेत सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान ऊंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजीविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजीविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल.
३० जून २०२५ पर्यंत या उपक्रमात २,००० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तीकरण करून त्यांच्या जलधारण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. बोडी आधारित शेती प्रणालीत माशांचे संगोपन, त्यावर कुक्कुटपालन आणि त्याच पाण्याचा वापर पिकांना दिला जातो. ही पद्धत शेती उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देते.
२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पांद्वारे सहभागी कुटुंबांना लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुप्पट होईल. तसेच शेती उत्पादकता वाढवून उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील. शेतकरी गटांच्या माध्यमांतून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल.
0000
संध्या गरवारे/विसंअ/