जळगाव दि. 25 जुलै 2025 (जिमाका वृत्तसेवा) : “आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु आणि पहिली सावली असते. झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे. झाडांमुळे मिळणारा प्राणवायू किती महत्त्वाचा आहे, हे आपण हॉस्पिटलमध्ये अनुभवतो,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
ते ‘एक पेड माँ के नाम’ या राज्यभर राबविण्यात येत असलेल्या पर्यावरणपूरक आणि भावनिक उपक्रमांतर्गत पाळधी (ता. धरणगाव) येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल म्हणाल्या की, “प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ही आपल्या सर्वांची गौरवाची बाब आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पर्यावरण रक्षण विषयक गीताने झाली. यानंतर शाळेच्या परिसरात फळझाडे व छायादायक वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक एन. के. देशमुख यांनी मानले.
या प्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी एन. एफ. चौधरी, गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, डॉ. भावना भोसले, सरपंच विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शालेय शिक्षण समिती यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले.
००००