शासनाच्या बांधिलकीची आणि मानवतेच्या हाकेची कहाणी

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत संपूर्ण राज्यात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना तात्काळ व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत मिळवून दिली जात आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत न देता गरजूंसाठी जगण्याची नवी उमेद निर्माण करणारी सामाजिक बांधिलकी सिद्ध झाली आहे.

या योजनेचा उद्देश गरीब व गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मादाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार मिळवून देणे तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेचा लाभ न मिळालेल्या रुग्णांनाही वैद्यकीय सहाय्य मिळवून देणे हा आहे.

राज्यातील अनेक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या नातेवाइकांचे प्राण वाचवले आहेत. जळगाव जिल्ह्यातही दिनांक १ मे २०२५ पासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत झाला असून, या कक्षाच्या स्थापनेमुळे गरजू रुग्णांना आता मुंबईत जाऊन अर्ज करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होऊन मदतीची प्रक्रिया अधिक तातडीने आणि सुलभपणे पार पडत आहे.

जिल्हास्तरीय कक्षाच्या माध्यमातून या वर्षी आतापर्यंत एकूण ६४७ गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्यात आले असून शासनाकडून एकूण ₹५ कोटी ७० लाख ४५ हजारांची मदत वितरित करण्यात आली आहे. रुग्णांना वेळेत मदत मिळणे म्हणजे त्यांच्या जीवनाला नव संजीवनी आहे. त्यातील काही रुग्णांच्या संजीवन कहाणी…!!

शिबिरात कर्करोगाचे निदान, तात्काळ मदतीने उपचार
पुण्यात वास्तव्यास असलेल्या संतोष गोविंद दांडगे यांना प्रकृती बिघडल्यावर जळगाव येथे येऊन उपचार सुरू करावे लागले. 09 ते 14 जून 2025 दरम्यान मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिरात सहभागी झाल्यानंतर त्यांना कर्करोगाचे निदान झाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिबिरामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला. त्यांच्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना तात्काळ ₹1,00,000/- मदत मंजूर करण्यात आली. त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आज ते स्थिर आहेत.

नवजात बाळाच्या जीवाला दिला आधार
रावेर येथील आरती स्वप्नील पाटील यांच्या बाळाची प्रकृती अत्यवस्थ होती. 2 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹50,000/- तात्काळ मदत मंजूर करण्यात आली. ही रक्कम उपचारासाठी मोलाची ठरली आणि बाळाचे प्राण वाचवले गेले.

हातमजुरी करणाऱ्या कुटुंबाला मिळाले जीवनदान
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील गणेश पूनमचंद कुमार यांचे सहा दिवसांचे बाळ श्वसन अडचणीमुळे अत्यवस्थ होते. जळगाव येथील पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ₹95,000/- खर्च अपेक्षित होता. हातमजुरी करणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम मोठी होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹50,000/- मदत मंजूर झाली आणि त्याच दिवशी उपचार सुरू झाले. बाळाचे प्राण वाचले.

कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी दिलासा
एरंडोल तालुक्यातील खेडी कडोली येथील दौलत बंडू सोनवणे यांना कॅन्सरची शस्त्रक्रिया आवश्यक होती. ग्लोबल कॅन्सर हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी ₹2.75 लाख खर्च अपेक्षित होता. आधीच चाचण्यांमध्ये मोठा खर्च झाल्यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खचले होते. अशा वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹1,00,000/- मदत मंजूर झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि कुटुंबीयांनी शासनाचे मन:पूर्वक आभार मानले.

मानवीतेचा हात – शासनाची बांधिलकी
या यशोगाथा केवळ आर्थिक मदतीच्या नाहीत, तर शासनाच्या माणूस केंद्रित दृष्टीकोन, त्वरित प्रतिसाद, आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहेत. या योजनेमुळे हजारो कुटुंबांना दुःखाच्या काळात दिलासा मिळाला असून ही योजना सामाजिक न्याय, संवेदना आणि सहानुभूती या मूल्यांची उन्नती करणारी ठरली आहे. अधिकाधिक गरजू रुग्णापर्यंत ही योजना जावी म्हणून उदाहरण दिली आहेत. हा विषय मानवी जीवनातील अत्यंत संवेदनशील विषय आहे.

ही सामाजिक बांधिलकी तर आहेच ही मानवतेची कहाणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव हा पत्ता वेदनेच्या काळातील काठी आहे.

अधिक माहिती व मदतीसाठी संपर्क करा:
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव.

0 0 0 0 0 0