मुंबई, दि.25 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती शिबिराला भेट देऊन तपासणी आणि जनजागृती उपक्रमाची माहिती घेतली.
महिलांनी व मुलींनी कर्करोगासंदर्भातील पूर्व चाचणी नियमितपणे करून घ्यावी. तसेच, कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी अशा शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात यावे. पूर्व तपासणीतून रोग लवकर लक्षात आल्यास वेळेवर निदान व उपचार शक्य होतात. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी होऊन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
राजभवन, मुंबई डिस्पेंसरी आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती शिबिर व व्याख्यानाचे आयोजन राजभवन क्लब येथे करण्यात आले.
कर्करोग पूर्व निदानासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातही ९ ते ४५ वयोगटातील मुली आणि महिलांसाठी गर्भाशयाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. CBC, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर, HPV टेस्ट, ENT तपासणी आणि प्रोस्टेट (PSA) टेस्ट यांचा समावेश हेाता. एकूण ११० व्यक्तिंना ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) प्रतिबंधक लस देण्यात आली. तपासणी शिबीराचा १७१ कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.
यावेळी आरोग्य तपासणी कार्यक्रमात कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका सप्रू बिसेन; कॅन्सर स्क्रिनिंग सेवा विभागाच्या कार्यकारी संचालिका सौ. नीता मोरे ; स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती पोयरेकर; तसेच जनरल सर्जन डॉ. सत्येंद्र मेहरा यांनी त्यांच्या तज्ज्ञ टीम व कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे पदाधिकारी व राजभवन दवाखान्यातील डॉक्टर, कर्मचारी, उपस्थित होते.
००००