सातारा दि.२६ – पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मंजूर केलेल्या घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकींना जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक निलेश गहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद्द, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त कुटुंबांची संख्या ५४६ आहे. या सर्व कुटुंबांना कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी घरकुले मंजूर करण्यात आली
आहे. यासाठी निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. धावडे येथे ७९, काहीर ३७, आंबेघर ३०, गोकुळ तर्फ ८, चाफेर १०२ येथे काम सुरू आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करावीत. देशमुखवाडी येथील १९२ घरकुलांचे काम पावसाळ्यानंतर त्वरित सुरू करावे.
त्याबरोबरच मोडकवाडी येथील ८८ घरकुलांच्या जागेसाठी पाहणी तातडीने करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
पापर्डे व येराड येथील जल पर्यटन केंद्राचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कामांची निविदा तात्काळ काढावी या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामांमध्ये काही अडचणी असतील तर त्या तातडीने दूर कराव्यात.
कराड चिपळूण मार्गाचा आढावा घेताना पालकमंत्री देसाई म्हणाले, म्हावशी फाटा ते संगम धक्का मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मिशन मोडवर काम करावे. कुठे अतिक्रमणे असतील तर ती तातडीने काढावी, अशा सूचना करून वाटोळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.