अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मार्केट यार्ड येथे अनावरण

अहिल्यानगर, दि.२७ जुलै – अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये व शासन १० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली.

मार्केट यार्ड चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महानगरपालिका आयुक्त डॉ.यशवंत डांगे, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य अॅड.गोरक्ष लोखंडे, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे, भन्ते राहूल बोधी, आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, “देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. आज येथे उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे त्यांच्या कार्याचा व विचारांचा खऱ्या अर्थाने गौरव आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक नियमितपणे प्रेरणा देणारे ठरेल.”

“जगातील सर्वोत्कृष्ट संविधान डॉ. आंबेडकरांनी भारताला दिले. त्यांनी गरीब, वंचित व शोषित घटकांना समानतेचा हक्क बहाल केला. यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी २५ हजार कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्रसूर्य अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलेले जाणार नाही.”

“बाबासाहेबांच्या समता व न्याय या तत्त्वांवर आधारलेले संविधान भारताला एकसंघ ठेवण्याचे कार्य करत आहे. प्रत्येक नागरिकाला विकासाची समान संधी संविधानामुळेच प्राप्त झाली आहे. भारतीय सामाजिक चळवळीला बळ देणारे नेतृत्व डॉ. आंबेडकर यांनी दिले. त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे पाहताना त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण सतत होत राहील.”

“इंदू मिल येथील भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. महापुरुषांच्या विचारांवर आधारित राज्यकारभाराची वाटचाल सुरू असून, नव्या पिढीने बाबासाहेबांचे विचार अंगीकारून आपल्या जीवनात सामाजिक समतेची दिशा निश्चितच स्वीकारावी, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, “महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजासाठी आपले जीवन समर्पित केले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात १९२८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती‌. अहिल्यानगर येथील निवासात असतांनाच त्यांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ग्रंथ लिहिला. लंडन गोलमेज परिषदेतून आल्यानंतर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. बाबासाहेबांचे अहिल्यानगर जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते होते.”

आमदार श्री.जगताप म्हणाले, “मार्केट यार्ड येथे साकार होत असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानाला कधीही धक्का लागणार नाही ते चिरकाल टिकणारे आहे.” अहिल्यानगर येथे संविधान भवन उभे राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

कार्यक्रमापूर्वी, गायक आनंद शिंदे यांच्या संगीत पथकाने आंबेडकरी गीतांचा कार्यक्रम सादर केला.

याप्रसंगी प्रा.जोगेंद्र कवाडे, पुतळा समितीचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, अशोक गायकवाड, अजय साळवे, नाथाभाऊ आल्हाट, सुरेश बनसोडे, महानगरपालिका जल अभियंता परिमल निकम, भन्ते राहूल बोधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात आयुक्त यशवंत डांगे‌ यांनी अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने केलेल्या विकासकामांचे सादरीकरण केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची वैशिष्ट्ये –

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक हे नवी दिल्ली येथील नव्या संसद भवन अर्थात सेंट्रल व्हिस्टा या वास्तूच्या प्रेरणेने साकारण्यात आले आहे. या स्मारकात १५ फूट उंचीचा चौथारा असून त्यावर १० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कास्य धातूपासून साकारलेला पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे एकूण वजन ९५० किलोग्रॅम आहे. या पुतळ्याच्या मागील भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी एलईडी स्वरूपात उभारण्यात आली आहे, तसेच साक्षरतेचे प्रतीक म्हणून लेखणीचे शिल्प पुतळ्याच्या समोरच्या बाजूस स्थापन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या धर्तीवर हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या निर्मितीसाठी रूपये १६ लाख ७९ हजार इतका खर्च आला आहे. या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ६६ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे.