मुंबई, दि. २८ :- भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना २८ जुलै २०२५ सायंकाळी ५.३० ते ३० जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.८ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यात पुढील २४ तासांसाठी पुणे घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोसीखुर्द प्रकल्प (वैनगंगा नदी) येथून २ लाख ४७ हजार ३ क्यूसेक्स, उजनी धरणातून ४१ हजार ६०० क्यूसेक्स, भिमा नदी दौंड पूल येथून ३२ हजार ६४० क्युसेक विसर्ग करण्यात आला असून नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने सरपखेड धोडप बुद्रुक मार्ग काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणात ९१ हजार ५४८ क्युसेक इतकी आवक होत असून धरणातून १ लाख २० हजार क्युसेक पाण्याची जावक असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/