भारतीय संस्कृतीत वाघ हे केवळ वन्य प्राणी नाही, तर सामर्थ्य, शौर्य आणि पर्यावरणीय संतुलनाचे प्रतीक मानले गेले आहे. देवी दुर्गेच्या वाहनापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफांवरील कोरीव वाघापर्यंत याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. याच वाघाच्या संवर्धनासाठी दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो – एक दिवस केवळ प्राण्यांसाठी नाही, तर आपल्याच संवेदना जागवणारा.
वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी असला, तरी त्याचे अस्तित्व म्हणजे संपूर्ण जैवविविधतेचे आरोग्य. एक वाघ सुमारे ५० ते १०० चौ.किमी परिसर व्यापतो आणि त्या अधिवासातील अनेक प्रजाती, झाडे, जलस्रोत यांचे संरक्षणही नकळत घडते. म्हणूनच म्हटले जाते – वाघ वाचला, तर जंगल वाचेल आणि जंगल वाचले, तर माणसाचे आयुष्यही सुरक्षित राहील. एकेकाळी भारतात ४० हजार वाघ होते, परंतु अविचारी शिकारी व जंगलतोडीमुळे १९७२ पर्यंत केवळ १,४०० इतकी संख्या उरली. या घटलेल्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ‘प्रोजेक्ट टायगर’ ही ऐतिहासिक मोहीम सुरू झाली आणि आज भारतात पुन्हा ३,१६७ वाघ अस्तित्वात आहेत – जगातील सर्वाधिक!
महाराष्ट्रातील वाघ संवर्धनात जळगाव जिल्ह्याचाही वाटा वाढतो आहे. विशेषतः यावल प्रादेशिक वनविभागात २०११ नंतर पुन्हा वाघ दाखल झाला. मेळघाटातून वाघ वाघदऱ्या, वढोदा रेंजमार्गे स्थलांतर करून यावलच्या जंगलात येतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. २०२४ मध्ये ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्टपणे वाघाचे दृश्य नोंदवले गेले. २०२५ मध्ये गौताळा-ऑट्रामघाट परिसरातही अशाच प्रकारच्या वाघाच्या उपस्थितीच्या बातम्या मिळाल्या. यावल विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या माहितीनुसार सध्या यावल परिसरात दोन वाघ ट्रांझिट अवस्थेत आहेत, तर मुक्ताईनगर भागात ‘बनाना टायगर’ म्हणून ओळखला जाणारा वाघ अधूनमधून दिसून येतो. त्याचप्रमाणे पाल जंगल सफारी मार्गावर वाघाच्या पावलांचे चिन्हही अलीकडेच आढळले आहेत आणि जंगल सफारी लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, यावल प्रादेशिक वनविभागात १२ मे २०२४ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात पार पडलेली वन्यप्राणी गणना ही एक वेगळाच अनुभव देणारी ठरली. यामध्ये चोपडा, वैजापूर, अडावद, देवझिरी, यावल (पूर्व-पश्चिम), आणि रावेर अशा सातही वनक्षेत्रात एकूण ३९ मचानींवर प्राणीगणना झाली. ८० निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला आणि एकूण ५८४ वन्य प्राण्यांची नोंद झाली. यामध्ये निलगाय, चिंकारा, भेकर, सांबर, चौशिंगा, काळवीट यांसारखे शाकाहारी, तसेच बिबट, लांडगा, कोल्हा, रानमांजर, तरस, अस्वल यांसारखे शिकारी प्राणी दिसून आले. विशेष म्हणजे रावेर वनक्षेत्रात एक वाघ आणि चार बिबटांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. हे सर्व प्राणी वाघाच्या नैसर्गिक अधिवासात सहअस्तित्व करणारे आहेत, म्हणूनच ही प्रजाती साखळी वाघाच्या अस्तित्वाला पूरक ठरते.
या संपूर्ण उपक्रमाचे यश हे केवळ वनविभागाचे नसून संपूर्ण जिल्ह्याचे आहे. जिल्हा प्रशासनाचे सहकार्य, निसर्गप्रेमींचा उत्साह, आणि श्रीमती निनू सोमराज (म. वनसंरक्षक), जमीर शेख (उपवनसंरक्षक), समाधान पाटील (सहायक वनसंरक्षक), तसेच चोख प्रशासन व मैदानातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समन्वयाने हे शक्य झाले.
वाघ वाचवणे म्हणजे केवळ एक प्रजाती वाचवणे नव्हे, तर हवामान, पाणी, माती, जंगल आणि पर्यायाने आपलेच भविष्य सुरक्षित ठेवणे होय. म्हणूनच आपण सर्वांनी जंगलतोड रोखणे, शिकारीविरोधात आवाज उठवणे, पर्यावरण शिक्षण वाढवणे आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
आजच्या दिवशी, जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया –
“वाघ वाचवा, जंगल वाचवा, जीवन वाचवा!”
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव