मुंबई, दि. ३० – जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील गोडावून राज्य वखार महामंडळाला भाडेतत्वावर देण्यात आले आहे. या गोडावूनच्या थकित वाढीव सेवा शुल्क व अकृषक कराच्या रक्कमेसंदर्भात राज्य वखार महामंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील राज्य वखार महामंडळाला दिलेल्या गोडावूनवरील अकृषक कर व सेवाशुल्कासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. रावल यांनी निर्देश दिले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, पणन संचालक विकास रसाळ, मार्कफेडचे व्यवस्थापक महेंद्र ढेकळे यांच्यासह जयसिंगपूर बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.
यावेळी श्री. यड्रावकर यांनी सुधारित थकित कराची रक्कम तातडीने मिळण्याची मागणी केली. मंत्री श्री रावल म्हणाले की, राज्य वखार महामंडळाला दिलेल्या जयसिंगपूर बाजार समितीच्या जागेवरील गोडावूनचा विषय सकारात्मक पद्धतीने मार्गी लावावा. सेवा शुल्क वाढवून देण्यासंदर्भात बाजार समितीने सहकार आयुक्तांकडे अपिल करून योग्य बाजू मांडावी. तसेच वखार महामंडळाने थकित अकृषक कराची रक्कम लवकरात लवकर द्यावी.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ