उमरखेड, महागाव मतदारसंघात गरजेच्या ठिकाणी रोहित्र बसवा, मनुष्यबळ वाढवा – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

जनतेच्या सुरक्षिततेसह अखंड व दर्जेदार वीजपुरवठा ही शासनाची प्राथमिकता

मुंबई, दि. ३० : जनतेच्या सुरक्षिततेसह अखंड व दर्जेदार वीजपुरवठा ही शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी प्रशासनाने तत्परता व कार्यक्षमतेने काम करावे असे निर्देश देत उमरखेड,महागाव मतदारसंघात गरजेच्या ठिकाणी रोहित्र बसविण्याचे व मनुष्यबळ वाढविण्याचे निर्देश उर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

उमरखेड आणि महागाव (जिल्हा यवतमाळ) तालुक्यांतील ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा आढावा संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या फोर्ट येथील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात झाली. यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांच्यासह उर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, आदिवासी बहुल तसेच दुर्गम भागांतील लोकसंख्येला सुलभ व अखंड वीजपुरवठा मिळण्यासाठी गरजेनुसार तातडीने नवीन रोहित्रे बसवावीत व सद्याच्या रोहित्रांची क्षमता वाढवावी. तसेच या भागांतील वीज यंत्रणांचे नियमित देखभाल-दुरुस्ती कामे सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्यात यावे. शहरी भागांत खांबावरील उघड्या वायरिंगमुळे अपघाताचा धोका उद्भवू नये यासाठी भूमिगत केबल टाकण्यास प्राधान्य द्यावे.

उमरखेड व महागाव तालुक्यातील वीजपुरवठ्याचा दर्जा उंचावण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा. विजपुरवठ्यासंदर्भात तक्रारी असलेल्या गावांची यादी तयार करून तात्काळ कार्यवाही करावी.

आवश्यक मनुष्यबळाच्या भरतीसाठी प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

राजु धोत्रे/वि.सं.अ/