पंढरपूर मतदारसंघातील विद्युत सुविधांच्या मजबुतीकरणाची कामे तातडीने करावी – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. ३० : पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असल्याने विद्युत सुविधांच्या मजबुतीकरणाची आवश्यकता असून त्यानुसार ही कामे दर्जेदार करावी, असे निर्देश उर्जा राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

एम एस ई बी होल्डींग कंपनी, फोर्ट येथे उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पंढरपूर मतदारसंघातील उर्जा विभागाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार समाधान आवताडे यांच्यासह उर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तीरावर व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या सुरक्षा तसेच अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उर्जा विभागाने नवीन उपकेंद्र, रोहित्र तसेच आवश्यक तेथे नवीन वीज विभाग स्थापन करण्याचे प्रस्ताव त्वरीत तयार करावेत.

कामे वेळेवर आणि गुणवत्तेने पूर्ण करावी, भाविकांचा सन्मान राखणे आणि पंढरपूरचा धार्मिक वारसा सुरक्षित ठेवणे याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

चंद्रभागा पात्रातील वीज केबल भुयारी करणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी वायरिंग सुरक्षित करणे या अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्यात यावे.अर्धवट तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशा कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात यावे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटींची पुनरावृत्ती होणार नाही असे त्यांनी सांगितले.

००००००००

राजु धोत्रे/वि.सं.अ/