निकृष्ट, विहित मुदतीत काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश -ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. ३० : बीड जिल्ह्यात उर्जा विभागाची निकृष्ट दर्जाची व वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी. अशा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे  निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.

एमएसईबी होल्डिंग कंपनी, फोर्ट, मुंबई येथे बीड जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामाच्यासंदर्भात आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीस खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, उर्जा विभागाची कामे ही दर्जेदार, वेळेत पूर्ण होणारी आणि जनहिताला प्राधान्य देणारी असली पाहिजे. बीड जिल्ह्यातील काही कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेच्या बाबतीत गंभीर त्रुटी आहेत.

लोकप्रतिनिधींनी दिलेली निवेदने आणि पत्रके गांभीर्याने घ्यावीत. जिल्ह्यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे आणि मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात.ग्रामीण व शहरी भागात आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, नवीन विद्युत खांब, भूमिगत केबल यांचे प्रस्ताव त्वरित मंजूर करून अंमलबजावणी  करावी.

लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांचा विश्वास जपणे ही प्रशासनाची प्राथमिकता असली पाहिजे. ऊर्जा क्षेत्रातील कामकाज नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे असल्यामुळे कामांच्या अंमलबजावणीत कुठलीही चालढकल खपवून घेतली जाणार नाही.

बैठकीदरम्यान बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील उर्जा समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढविणे, रोहित्रांची संख्या वाढविणे आणि विविध नवीन योजनांची अंमलबजावणी यावर भर देण्याचे ठरले.

000000000

राजु धोत्रे/वि.सं.अ/