नाशिक विभागात एक ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा होणार: विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांचा होणार सत्कार, विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणार

नाशिक, दि. ३१ : नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे. विभागातील लोकप्रतिनिधींचा सहभाग, नागरिकांपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना पोहोचवणे, चांगले काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव यानिमित्त करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणात हा सप्ताह साजरा करुन प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचे आवाहन  विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधला. यावेळी अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ, अपर आयुक्त (प्रशासन) सुभाष बोरकर, सहायक आयुकत विठ्ठल सोनवणे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की,  सर्व जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे सर्वांगीण नियोजन करण्यात यावे. राज्य शासनाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल सप्ताह साजरा करण्यासंदर्भात स्वयंस्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अधिक व्यापक प्रमाणात हा सप्ताह साजरा करावा.

दिनांक 1 ऑगस्ट रोजी महसूल सप्ताहास प्रारंभ होईल. यानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. दिनांक 2 ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना या अतिक्रमित जागेचे पट्टे वितरण करणे, कार्यक्रम होईल. दिनांक 3 ऑगस्ट रोजी पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. दिनांक 4 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान पाचही जिल्ह्यातील प्रत्येक मंडळस्तरावर राबविण्यात यावे, विविध शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत त्याद्वारे पोहोचवणे, दिनांक 5 ऑगस्ट रोजी सामाजिक विशेष अर्थसाहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची गृहभेटी घेऊन त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करुन हा लाभ त्यांना देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, दिनांक 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकार जमा करणे) निर्णय घेणे, दिनांक 7 ऑगस्ट रोजी एम- सॅण्ड धोरणाची अंमलबजावणी करणे आदी उपक्रम या सप्ताहात राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिली.