छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी

परभणीसह मराठवाड्याच्या विकासाचे नवे पर्व - राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ३१ : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होते, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश;

,१७९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेच्या दुहेरी मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली असून यासाठी २,१७९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी स्वतः केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याच पाठपुराव्याला यश मिळाले असून १७७ किलोमीटरचा दुहेरी मार्ग साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद

पालकमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर पुढे म्हणाल्या, ‘या मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता या मंजुरीमुळे दुहेरी मार्ग प्रत्यक्षात साकारणार असून छत्रपती संभाजीनगर ते परभणी यादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे’.

‘दुहेरीकरणाचा फायदा केवळ नियमित प्रवाशांनाच नाही, तर शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि मराठवाड्यातील उद्योगांनाही होणार आहे. शिवाय रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे’, असेही पालकमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्याच्या विकासाला प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या विकासाला सातत्याने प्राधान्य देत आहेत. मराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहेत. विशेष म्हणजे या मंजुरी प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठपुरावाही अतिशय महत्त्वाचा ठरला असल्याचे पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ