जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा आरंभ

मुंबई, दि.०१ : शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सूचनांनुसार 1 ऑगस्ट, ‘महसूल दिनापासून मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा आरंभ जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते झाला.  मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक तहसिलदार युवराज बांगर यांनी केले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी कटियार यांनी महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, उपविभागीय अधिकारी कल्पना गोडे, तहसिलदार युवराज बांगर, अजय पाटील, राजेंद्र चव्हाण व जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या  अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरित केले.

नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा व शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत जलद गतीने पोहोचविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कटियार यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताह अंतर्गत दि. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल दिनी महसूल अधिकारी व कर्मचारी गुणगौरव, फेरफार नोंदीसाठी कॅम्प राबविणे,  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत प्रत्येक तालुकानिहाय विविध दाखले देण्याची मोहीम राबविणे. विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार कार्यवाही करणे. M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे हे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड म्हणाले, बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब  करावा. महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेशी सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज साळुंके, मधुरा साडविलकर यांनी केले. तर आभार नायब तहसिलदार पुरुषोत्तम थोरात यांनी मानले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, भागवत गावंडे व जिल्हयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हा ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजय  सोनंदकर व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाळा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त कोकण विभागातून उत्कृष्ट अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड व नायब तहसिलदार (जमीन) पुरुषोत्तम थोरात यांना अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे व विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते कोकण विभागस्तरीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

०००