मुंबई, दि. ०४: महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यापासून महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत. हे संबंध व्यापारवृद्धीच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यास महाराष्ट्र उत्सुक असून खनिज उत्खनन क्षेत्रात व्यापारवृद्धीच्या मोठ्या संधी आहेत, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांनी आज महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनी व्यापारवृद्धीच्या क्षेत्रांबाबत औपचारिक चर्चा करण्यात आली.
मंत्री रावल म्हणाले, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही देश विकासाच्या वाटेवर आहेत. महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. येथे पर्यटनाबरोबरच विविध क्षेत्रात विकासाच्या संधी आहेत. खनिज उत्खनन, विविध उत्पादने आदी क्षेत्रे निश्चित करुन महाराष्ट्र आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान व्यापार वृद्धी शक्य आहे. याच माध्यमातून दोघांमधील ऐतिहासिक संबंध अधिक वृद्धींगत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला दक्षिण आफ्रिकेविषयी नेहमीच आत्मियता राहिली असल्याचे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले
दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गिडीयन लबाने यांनी महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यान केलेल्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य आणि विकासामध्ये मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले. भारत हे कृषी उत्पादन क्षेत्रात चांगले कार्य करीत असून दक्षिण आफ्रिकेला मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ