मुंबई, दि. ०४: महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया दरम्यान वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापारवृद्धीची मोठी संधी आहे. महाराष्ट्रातील कापूस आणि दक्षिण कोरियातील टेक्स्टाईल मशिनरी यांच्या माध्यमातून भागिदारीने परस्पर संबंध अधिक वृद्धींगत होतील, असा विश्वास राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
दक्षिण कोरियाचे महावाणिज्यदूत डोंगवान यू यांनी मंत्री रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि कोरिया दरम्यान व्यापारवृद्धीच्या विविध संधींवर चर्चा करण्यात आली.
मंत्री रावल म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे. उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देऊन महाराष्ट्र आणि कोरियादरम्यान व्यापारवृद्धीच्या संधी निश्चित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने महाराष्ट्र आणि कोरियामध्ये गुंतवणूक आणि व्यापाराच्या विविध संधी विचारात घेऊन इच्छुकांना प्रोत्साहन देता येईल. विशेषत: महाराष्ट्रातील कापूस आणि कोरियातील टेक्स्टाईल मशिनरी यांच्या माध्यमातून भागिदारीने व्यापार करुन परस्पर संबंध वृद्धींगत होतील, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात मुंबई-पुण्याबरोबरच विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. महाराष्ट्र ॲग्रो प्रोसेसिंग बरोबरच फळे, भाजीपाला निर्यातीत अग्रेसर असून कोरियाच्या उद्योजकांचे राज्यात स्वागतच केले जाईल, असेही मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.
कोरियन महावाणिज्यदूत डोंगवान यू यांनी व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील महत्त्वाचे राज्य असल्याचे सांगितले. मुंबई-पुणे परिसरात विविध उत्पादनांच्या अनेक कोरियन कंपन्या असल्याचे सांगून येत्या 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कोरियन महोत्सवासाठी त्यांनी मंत्री रावल यांना निमंत्रण दिले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ