नागपूर, दि. 4 : जिल्ह्यातील गावागावातील पांदण रस्ते, पाण्याचे प्रश्न समस्या सोडविण्यास प्राधान्य आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी गावात गावभेट देण्याची गरज आहे. गाव भेट दिल्यास गावातील समस्या समजून घेण्यास मदत होईल. आठवड्यातून एक दिवस अधिकाऱ्यांनी संबंधित गावात भेटी देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे सांगितले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज कोदामेंढी आणि खात या मौदा तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या वेळ मिळत आहे तशा तक्रारी समजून घेत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासकामांसाठी अनुकूल लागणारे निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या क्षेत्रासाठी काय नवनिर्माण होत आहे याची अपेक्षा नागरिकांना असते. त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अडचणी व समस्या समजून घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला गाव दौरा करायचे ठरविले आहे. गाव भेटीत सरपंच आणि जनतेने दिलेले निवेदन घेऊन त्यावर उचित कार्यवाही होणार असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी पादंण रस्ते हा जिव्हाळ्याचा विषय असतो पुढील पाच वर्षात पानंद रस्ते मोठ्या प्रमाणात करून शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहत भक्कमपणे काम सुरू असल्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे यावेळी म्हणाले.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, निवेदने स्वीकारली व संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले.
मौदा क्रीडा संकुलातील विविध विकासकामांचे भूमिपूजन
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मौदा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात 200 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुट्सल ग्राउंड व जिम सह इतर विकास कामांचा समावेश आहे. यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर,जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी माया दुबळे यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
******