‘आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई, दि. ११ : शासन, समाज आणि व्यक्ती यांच्यातील सुसंवाद दृढ करण्यासाठी तसेच विचारप्रवृत्त व माहितीपूर्ण लेखन वाचकांसमोर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेचा विशेषांक मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

प्रकाशन सोहळ्यास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेषांकात ‘भारतातील प्राचीन रंगांचा इतिहास’, ‘शालेय शिक्षण विभाग व माननीय न्यायालय यांचा परस्पर संबंध’ यांसारखे सखोल व ज्ञानवर्धक लेख समाविष्ट आहेत. शासनाच्या कार्याचे संवेदनशील व मानवी रूप वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सकारात्मक संवादाची नवी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकातून करण्यात आला आहे.

‘आपलं मंत्रालय’ या उपक्रमातून वाचक, समाज आणि शासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व बळकट होईल, असा विश्वास डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

हा विशेषांक https://publuu.com/flip-book/945595/2075357 या लिंकवर वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे.

०००

अश्विनी पुजारी/ससं/