रक्षाबंधनानिमित्त ‘द चिल्ड्रन एड’ संस्थेस मंत्री आदिती तटकरे यांची भेट

मुंबई, दि. ११ : अनेक दशकांपासून बालकल्याणासाठी समर्पित असलेल्या माटुंगा येथील ‘द चिल्ड्रन एड’ संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी भेट देत पाहणी करून कामकाजाची माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेतील मुलांसोबत संवाद साधत त्यांच्या सहवासात रक्षाबंधन साजरे करण्याचा विशेष आनंद लाभला असल्याच्या भावना मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

अनेक वर्षापासून कार्यरत असलेली ही संस्था बालकांना शिक्षण, कला, नृत्य आणि विविध उपक्रमाद्वारे प्रगतीची संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच विविध सुविधांसह बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत असल्याचे अनुभवायला मिळाले असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुलांना राख्या बांधल्या, मुलांशी संवाद साधला, मुलांनी बनविलेल्या विविध वस्तुंचे कौतुक केले.

माटुंगा येथे असलेल्या ‘द चिल्ड्रन एड’ संस्थेत मुलांना औपचारिक शिक्षण, तसेच एसएससीनंतरचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच कौशल्य शिक्षण, तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक या संस्थेमध्ये नियमित भेट देतात तसेच विशेष वैद्यकीय सुविधाही मुलांना उपलब्ध करून देण्यात येतात.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/